मनसेची उत्तर भारतीयांना साद; चर्चेला उधाण 

कांदिवली परिसरात लावण्यात आलेल्या भोजपुरी बॅनर्सच्या माध्यमातून मनसेने उत्तर भारतीय मतदारांना पक्षात सामील होण्याचे आवाहन केले आहे.
bhojpuri banners
bhojpuri banners

मुंबई: एकेकाळी परप्रांतीयांविरोधात रान उठवणाऱ्या आंदोलनांमुळे चर्चेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता चक्क मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना साद घालायला सुरुवात केल्याचे चित्र दिसते. त्यासाठी मुंबईच्या कांदिवली परिसरात भोजपुरी भाषेत ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. मनसेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात मनसैनिकांनी अनेक उत्तर भारतीयांना चांगलाच चोप दिला होता. मग ते ठेल्यावरील अस्वच्छ पाणीपुरी असोत, स्थानकाबाहेरील अतिक्रमण असोत किंवा मुजोर रिक्षा व टॅक्सी चालक असोत. जिथे-जिथे उत्तर भारतीयांकडून नियमांचे उल्लंघन केले गेले तिथे-तिथे मनसेने मनसे स्टाईल राडा घातला. 

परंतु, आता त्याच मनसेकडून उत्तर भारतीयांना साद घातली जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनसेने हिंदुत्त्वाचा अजेंडा आत्मसात केल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत पाहायला मिळणारा हा बदल अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरत आहे. मनसेचा अजेंडा मराठीकडून हिंदुत्त्वाकडे झुकल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. कांदिवली परिसरात लावण्यात आलेल्या या भोजपुरी बॅनर्सच्या माध्यमातून मनसेने उत्तर भारतीय मतदारांना पक्षात सामील होण्याचे आवाहन केले आहे.  दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी मनसेची सदस्य नोंदणी मोहिम सुरु झाली होती. यानंतर घाटकोपर परिसरात नागरिकांना पक्षात सामील होण्याचे आव्हान करण्यासाठी मनसेने गुजराती भाषेतही बॅनर्स लावले होते. त्याचीही बरीच चर्चा रंगली होती.

जय श्री राम …हिंदुत्व के सम्मान में उत्तर भारतीय भी मनसे के साथ मैदान में, महाराष्ट्र की उन्नति और हिंदुत्व की बुलंद आवाज…हर हिन्दू की लड़ाई लड़ने वाले योद्धा आपन हिन्दू जननायक श्री राजसाहेब ठाकरे के साथ पूरी ताकत के साथ जुडेके बा, हमहू ई अभियान से जुडल बा, आप लोगन से बिनती करात बा, आप लोग भी ई मंगल अभियान से जुड़ जाई, और पूरे महाराष्ट्र के भगवा रंग में बदल देइ… अशी साद मनसेने बॅनर्सवर भोजपुरी भाषेत घातली आहे. 

दरम्यान, माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर मुंबईतील बोरिवलीत या पोस्टरवर गुजराती भाषेचा वापर केला गेला. यामुळे त्यावर मनसेने काही चिठ्या चिकटवण्यात आल्या. हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही, अशाप्रकारचे मजकूर लिहिण्यात आला होता. आता मनसेच्या भोजपुरी भाषेतील बॅनर्सवर राजकारणातील नेमक्या कुणाकुणाच्या व कशा प्रतिक्रिया येतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com