वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना पत्र; दिले महत्वाचे संकेत... - Raj Thackeray has written a letter to party workers on the occasion of birthday | Politics Marathi News - Sarkarnama

वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना पत्र; दिले महत्वाचे संकेत...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 जून 2021

राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र ट्विट केलं आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा वाढदिवस 14 जून रोजी आहे. त्यानिमित्त त्यांनी कार्यकर्त्यांना पत्रं लिहिलं आहे. दरवर्षी वाढदिवसानिमित्त त्यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी होते. पण कोरोनामुळे वाढदिवस साधेपणाने करण्याचे आवाहन ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच नव्या कार्यक्रमांविषयी तुमच्याशी बोलायचे आहे, असे सांगत महत्वाचे संकेत दिले आहेत. (Raj Thackeray has written a letter to party workers on the occasion of birthday)

राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र ट्विट केलं आहे. कोरोनाच्या या स्थितीत वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही, असे त्यांनी म्हटलं आहे. 'हेही वर्ष बिकट आहे. अजूनही कोरोनानं महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. हे वातावरण असं आहे की आपण सावध असलं पाहिजे. खबरदारी घेतली पाहिजे. प्रवास करणं, मोठ्या प्रमाणात गर्दी करणं, गाठी-भेठी अशा गोष्टी करणं अजूनही टाळ्या पाहिजेत. त्यामुळं भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच रहा,' असे आवाहन ठाकरे यांनी केलं आहे.

हेही वाचा : शिवसेनेत गेल्याने काँग्रेसची कोंडी! कपिल सिब्बल पडले तोंडघशी

थोड्याच दिवसांत भेटणार

राज ठाकरे यांनी पत्रामध्ये कार्यकर्त्यांना लवकरच भेटणार असल्याचे म्हटले आहे. 'थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे. पक्षाच्या धोरणांविषयी, नव्या कार्यक्रमांविषयी तुमच्याशी मला बोलायचं आहेच. तोपर्यंत जिथे आहात तिथेच पूर्ण काळजी घेऊन कामात रहा. महाराष्ट्राला आत्ता आमच्या कामातून एक दिलासा देण्याची आणि आश्वस्त करण्याची गरज आहे. म्हणून समाजोपयोगी कामात रहा. त्याच मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मी आनंदानं स्वीकारीन,' असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

परिस्थितीचं भान राखा

'तुम्ही सर्वांनी ह्या कोरोना काळा जागरूकपणे चांगलं काम केलंत, ज्याचा मला अभिमान आहे. अशाच कामात रहा. अजूनही आपली माणसं दु:खात आहेत. कुणाची घरची माणसं गेली, त्यात आपल्या पक्षातलेही कितीतरी जण दुर्दैवानं आपल्याला सोडून गेले. तसंच कुणाचे रोजगार गेले, त्या सर्वांना धीर द्या. त्यांच्यासाठी आत्ता करता आहात तसंच काम करत रहा. आजवर राखलंत तसंच परिस्थितीचं भान राखा,' असं आवाहनही ठाकरे यांनी केलं आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख