उद्धव ठाकरेंचे अंबानींशी मधूर संबंध तर वाझेही जवळचा! राज ठाकरेंचा बाण... - Raj Thackeray criticise CM Uddhav Thackeray over sachin vaze link | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धव ठाकरेंचे अंबानींशी मधूर संबंध तर वाझेही जवळचा! राज ठाकरेंचा बाण...

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 मार्च 2021

राज्यात भाजप व शिवसेनेची सत्ता आल्यानंतर वाझेने शिवसेनेत प्रवेश केला. वाझेला शिवसेनेत कोण घेऊन गेले? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई : सचिन वाझे हा ख्वाजा यूनूस प्रकरणात काही वर्ष निलंबित आणि ५८ दिवस तुरूंगात होता. राज्यात भाजप व शिवसेनेची सत्ता आल्यानंतर वाझेने शिवसेनेत प्रवेश केला. वाझेला शिवसेनेत कोण घेऊन गेले? पुन्हा पोलिस खात्यात आणावे, असे उध्दव ठाकरेंनी फडणवीसांना सांगितले. यावरून वाझे हा त्यांच्या अत्यंत जवळचा माणूस होता. अंबानी आणि ठाकरे यांचे अत्यंत मधूर संबंध आहेत. मग वाझे बाँम्बची गाडी कोणी सांगितल्याशिवाय ठेवला का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे आणि वाझेमधील संबंध तसेच वाझेचा स्फोटक प्रकरणाशी संबंध या दोन्ही गोष्टींचा संबंध जोडत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवरच बाण सोडल्याची चर्चा आहे. बाँम्ब ठेवण्यासाठी कोणाच्या सुचना असल्याशिवाय पोलिस असे धाडस करणार नाहीत. त्यामुळे हा विषय वाझे आणि परमबीर सिंह यांच्यावर अटकवून चालणार नाही, असे सांगत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

हेही वाचा : वाझे प्रकरणाची केंद्रानं चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल...

पत्रातील भाषा गुजराती माणसाप्रमाणे...

राज ठाकरे यांनी अंबानींच्या घराबाहेर कारमध्ये सापडलेल्या पत्राचाही उल्लेख यावेळी केला. पत्रामध्ये अंबानींचा उल्लेख आदरार्थी केला आहे. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, धमकी देणारा कुणी आदराने उल्लेख करेल का? एखादा गुजराती माणूस जसा हिंदी बोलतो तसा या पत्रातील भाषेचा टोण आहे. असे धाडस पोलिस करू शकत नाहीत, असे ठाकरे म्हणाले. 

तर देश अराजकतेकडे...

केंद्र सरकारने वाझे प्रकरणाची चौकशी केली नाही, तर देश अराजकतेकडे जाईल. कुणाच्याही घराबाहेर जिलेटिन भरलेल्या गाड्या उभ्या केल्या जातील. देशासह जगभरात मुंबई पोलिसांसारखे पोलिस नाहीत. पण राज्यकर्त्यांची त्यांची ही हालत केली आहे. लोक त्यांच्याकडे बोट दाखवू लागले आहेत, अशी नाराजी ठाकरे यांनी व्यक्त केली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सचिन वाझे यांनी कोणी सांगितल्याशिवाय गाडी ठेवली नसणार. जो विचार अतिरेकी करतात तो विचार करायला पोलिसांना भाग पाडलं. यामागे नेमकं कोण आहे, हे बाहेर यायला हवं. मात्र, राज्य सरकारकडून हा तपास केला जाणार नाही. त्यामुळे या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून या प्रकरणाची कसून चौकशी करावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. 

अंबानींच्या घराखाली स्फोटकांची कार हा मुळ विषय आहे. बाँम्ब पोलिस ठेवतात, हे मनाला पटतच नाही. या सगळ्या प्रकरणात वाझेंना अटक झाली. त्यांची चौकशी सुरू आहे. जिलेटिन आले कुठून. अंबांनीच्या सुरक्षेमध्ये इस्त्राईली लोक आहेत. मध्य प्रदेश सरकारची सुरक्षा आहे. अशा सुरक्षाव्यवस्थेत या रोडवर एक गाडी चोवीस तास उभी राहते. असे धाडस पोलिस करू शकणार नाहीत. अंबांनींकडून पैसे काढणे, सोपे आहे का? त्यामुळे पैशांसाठी हा कट रचल्याची ही थिअरी चुकीची आहे. ही गाडी कोणी ठेवण्यास सांगितले, हे बाहेर यायला हवे. केंद्राने तत्काल हस्तक्षेप करावा, असे ठाकरे म्हणाले. 

देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यावा

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी गोळा करण्याच्या सुचना वाझेला दिल्याचे आरोप केले आहेत. अशी घटना महाराष्ट्र किंवा देशातही कधी घडली नाही. गृहमंत्र्यांनी अशी गोष्ट करायला सांगणे, महाराष्ट्रासाठी लाजीरवाणे आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळी राजीनामा द्यावा किंवा त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख