राज ठाकरेंचा शिक्षणमंत्र्यांना फोन, सकारात्मक निर्णयाचे आश्वासन - Raj Thackeray calls Education Minister, assures positive decision | Politics Marathi News - Sarkarnama

राज ठाकरेंचा शिक्षणमंत्र्यांना फोन, सकारात्मक निर्णयाचे आश्वासन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

रायन इंटरनॅशनल आणि बिलाबॉंग हाय इंटरनॅशनल स्कुल या दोन शाळांच्या पालकांनीही राज ठाकरे यांची भेट घेऊन वाढीव फी संदर्भातील त्यांची तक्रार मांडली.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे राज्यातील दहावी उत्तीर्ण झालेल्या लाखो विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा मार्ग रोखला गेल्याची खंत सोमवारी (ता.2) विद्यार्थी- पालक समन्वय समितीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. 

पालकांचा रोष पाहून राज यांनी पालकांसमक्ष शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना फोन लावला. यावेळी उद्या (ता.3) सकाळपर्यंत या विषयाबाबत सरकारचा निर्णय आपल्याला कळवते, असे सकारात्मक आश्वासन वर्षा गायकवाड यांनी दिले.

रायन इंटरनॅशनल आणि बिलाबॉंग हाय इंटरनॅशनल स्कुल या दोन शाळांच्या पालकांनीही राज ठाकरे यांची भेट घेऊन वाढीव फी संदर्भातील त्यांची तक्रार मांडली. शाळा शिकवणी शुल्कासोबत इतरही अतिरिक्त शुल्क आकारत आहेत,

ते शुल्क कोरोना संकटकाळाचा विचार करता माफ होणे गरजेचे असल्याचेही पालकांनी राज यांनी सांगितले. ए.पी.जे.अब्दुल कलाम मेमोरियल घाटकोपर येथील नर्सरीसाठी पालकांनी 53 हजार रुपये शुल्क भरले. प्रत्यक्षात एकदाही शाळा भरली नाही. 3/4 वर्षाच्या लहान मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे.

त्यांना नेमके काय शिकवले जात आहे? अशी तक्रारही पालकांनी केली. शिकवणी वर्ग सुरु करण्यास परवानगी द्यावी यासाठी पुण्याहून आलेल्या कोचिंग क्‍लासेस संचालकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. 

आयटीआयमधील तासिका तत्त्वावरील अनुभवी तासिका निदेशकांना कंत्राटी पद्धतीने सामावून घेण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, शालिनी ठाकरे, सुधाकर तांबोळी, किर्तीकुमार शिंदे, अजय शिंदे आदी उपस्थित होते.

परवानगी देण्याची मागणी
चालू वर्षासाठी भरलेली फी पुढच्या शैक्षणिक वर्षात समायोजित करून घ्यावी, यासाठी आपण हस्तक्षेप करावा, अशी मागणी पालकांनी राज ठाकरे यांच्याकडे केली. लॉकडाऊननंतर आता सुरळीत सुरू झालेले असताना शिकवणी वर्ग बंद का ?

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून 1 नोव्हेंबरपासून शिकवणी वर्ग सुरू करायला परवानगी द्यावी, अन्यथा, पालकांचे संमतीपत्र घेऊन एकाच दिवशी सर्व कोचिंग क्‍लासेस सुरू करू, असा इशारा कोचिंग क्‍लासेस असोसिएशन, महाराष्ट्र यांनी दिला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख