बेळगावातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवा..शिवसेनेचे आवाहन - Raise your voice against injustice in Belgaum Shiv Sena appeal | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

बेळगावातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवा..शिवसेनेचे आवाहन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 मार्च 2021

बेळगावातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, मराठी माणसाला न्याय द्या,  असे आवाहन 'सामना'तून करण्यात आले आहे.

मुंबई : कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने बेळगावमध्ये काही दिवसापूर्वी शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला केला. 'सामना'मधून या विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. "बेळगावातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, मराठी माणसाला न्याय द्या!" असे आवाहन करण्यात आले आहे.

"कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने बेळगावसह सीमा भागातील मराठी माणसांवर हल्ले सुरू केले आहेत. मराठी भाषिकांच्या दुकानांवरील मराठी पाटय़ा उचकटवून टाकणे, मराठी ‘नंबरप्लेट’ असलेल्या गाडय़ांवर हल्ले करणे, मराठी तरुणांनी मोबाईलवर मराठी भाषेचे स्टेटस ठेवल्याचा राग म्हणून त्यांना अमानुष मारहाण करणे, ‘मराठी भाषिक वाघ आहेत’ अशा प्रकारच्या स्टेटसवर आक्षेप घेऊन जुलूम करणे हे अमानुष आणि लोकशाहीविरोधी आहे. कर्नाटकात आणि दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. बेळगावातील मराठी भाषिकांवरील अत्याचारांविरुद्ध एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री व देशाच्या पंतप्रधानांकडे घेऊन जाच. बेळगावातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, मराठी माणसाला न्याय द्या!" असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. 

हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे व महाराष्ट्र जे बोलतो ते करून दाखवतो. यावर कर्नाटकाच्या एका मंत्र्याने असे तारे तोडले की, ‘‘शिवराय हे तर कर्नाटकाचे होते.’’ बरे झाले, यानिमित्ताने कानडी राजकारण्यांना शिवराय आपले वाटू लागले. अहो, कानडी आप्पा, शिवराय तुमचेच म्हणता ना, मग बेळगाव महानगरपालिकेवरील शिवरायांचा भगवा ध्वज उतरविण्याचे पाप का करता ? शिवराय खरंच तुमचे असतील तर मग बेळगावात ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणणाऱयांची डोकी का फोडता? शिवराय तुमचेच आहेत हे मान्य केले तर येळ्ळूर गावातील शिवरायांचा पुतळा रातोरात का हलवता? शिवराय तर संपूर्ण विश्वाचेच आहेत. कर्नाटकाच्या मातीत शिवरायांच्या घोडय़ाच्या टापा उमटल्या असतील, पण शिवरायांच्या जीवनाचे सार काही त्यांच्या मातीत मिसळून गेल्याचे दिसत नाही. ज्या पद्धतीने मराठी भाषिकांवर अमानुष अत्याचार कानडी मुलुखांत सुरू आहेत ते येडुरप्पांचे भाजप सरकार उघडय़ा डोळय़ांनी पाहत आहे. नुसतेच पाहत नाही तर अत्याचार करणाऱयांना बळ देत आहे. बेळगावचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. म्हणजे प्रकरण न्यायप्रवीष्ट असताना कानडी संघटनांनी हा असा तमाशा करणे बेकायदेशीर आहे, असे अग्रलेखात म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे अग्रलेखात..

मराठी भाषिकांच्या दुकानांवरील मराठी पाटय़ा उचकटवून टाकणे, मराठी ‘नंबरप्लेट’ असलेल्या गाडय़ांवर हल्ले करणे, मराठी तरुणांनी मोबाईलवर मराठी भाषेचे स्टेटस ठेवल्याचा राग म्हणून त्यांना अमानुष मारहाण करणे, ‘मराठी भाषिक वाघ आहेत’ अशा प्रकारच्या स्टेटसवर आक्षेप घेऊन जुलूम करणे हे अमानुष आणि लोकशाहीविरोधी आहे. त्याआधी बेळगाव महापालिकेवरील भगवा ध्वज उतरवून तेथे त्या कन्नड रक्षण वेदिकेवाल्यांनी लाल-पिवळा ध्वज लावला. त्यावरून मराठी तरुण आणि कानडी पोलिसांत झटापट झाली, त्यात गुन्हेगार ठरवले गेले ते मराठी तरुण. हे गेल्या सत्तरेक वर्षांपासून सुरूच आहे. आताही दोन दिवसांपूर्वी बेळगावात शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर हल्ला करून फार मोठे शौर्य गाजविले या भ्रमात त्या कानडी संघटनांनी राहू नये. या सर्व प्रकरणी महाराष्ट्राने संयम सोडला तर कानडी राज्यास जबरदस्त अशी आर्थिक व इतर किंमत मोजावी लागेल; पण देश एक आहे असे आम्ही मानतो. देशांतर्गत भाषिक वाद म्हणजे मराठी किंवा कानडी भाषिकांचा झगडा नाही. दोन भाषिकांनी या प्रश्नी समोरासमोर येऊन एकमेकांची डोकी फोडावीत, एकमेकांच्या मालमत्तांचे नुकसान करावे असे आम्हाला अजिबात वाटत नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे व महाराष्ट्र जे बोलतो ते करून दाखवतो. यावर कर्नाटकाच्या एका मंत्र्याने असे तारे तोडले की, ‘‘शिवराय हे तर कर्नाटकाचे होते.’’ बरे झाले, यानिमित्ताने कानडी राजकारण्यांना शिवराय आपले वाटू लागले. अहो, कानडी आप्पा, शिवराय तुमचेच म्हणता ना, मग बेळगाव महानगरपालिकेवरील शिवरायांचा भगवा ध्वज उतरविण्याचे पाप का करता? शिवराय खरंच तुमचे असतील तर मग बेळगावात ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणणाऱयांची डोकी का फोडता? शिवराय तुमचेच आहेत हे मान्य केले तर येळ्ळूर गावातील शिवरायांचा पुतळा रातोरात का हलवता? शिवराय तर संपूर्ण विश्वाचेच आहेत. कर्नाटकाच्या मातीत शिवरायांच्या घोडय़ाच्या टापा उमटल्या असतील, पण शिवरायांच्या जीवनाचे सार काही त्यांच्या मातीत मिसळून गेल्याचे दिसत नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख