राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी शरद पवारांच्या प्रकृतीबाबत फोन केला नाही... - Rahul Gandhi, Sonia Gandhi did not call about Sharad Pawar health ...  | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी शरद पवारांच्या प्रकृतीबाबत फोन केला नाही...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 मार्च 2021

भाजपचे आमदार अतूल भातखळकर यांनी टि्वट करून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला टोला हाणला आहे.

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी पवार यांच्या तब्येतीचे वृत्त समोर आल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. प्रकृती बिघडल्यानंतर पवारांनी टि्वट केले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचे पवार यांनी टि्वटवरून आभार मानले आहेत. डॉ. हर्ष वर्धन यांनीही फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही शरद पवार यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर दिल्लीतील एकाही नेत्याने विशेषतः राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची चैाकशी केली नाही, असे टि्वट करून भाजपचे आमदार अतूल भातखळकर यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला टोला हाणला आहे.
  
शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी येथे शरद पवार यांच्यावर एंडोस्कोपीनंतर मंगळवारी रात्रीच शस्त्रक्रिया करण्यात आली. पवारांना पोटदुखीचा जास्त त्रास होऊ लागल्याने आणि काही मेडिकल कॉम्पलिकेशन्स निर्माण झाल्याने शस्त्रक्रिया बुधावारी करण्याऐवजी मंगळवारी रात्रीच करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी फोटो टि्वट केला आहे. ब्रीच कँडीमध्ये पवारांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे.

शरद पवार यांच्यावर काल झालेल्या शस्त्रक्रियेनंतर आज त्यांची प्रकृती उत्तम आहे. आज सकाळी वृत्तपत्रांचे वाचन करतानाचा फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केला आहे. पवार अत्यंत प्रसन्न मुद्रेत असल्याचे या फोटोवरुन जाणवत आहे. 

दरम्यान काल रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात सुप्रिया सुळे यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार रोहित पवार यांचेही छायाचित्र सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केले होते. पवार यांची तब्येत अचानकच बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख