कृषी कायदे रद्द न करण्यासाठी पंतप्रधानांवर विदेशी शक्तींचा दबाव; बच्चू कडूंचा आरोप - Pressure from foreign powers not to repeal agricultural laws says bachu kadu | Politics Marathi News - Sarkarnama

कृषी कायदे रद्द न करण्यासाठी पंतप्रधानांवर विदेशी शक्तींचा दबाव; बच्चू कडूंचा आरोप

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

दिल्लीत 26 जानेवारीला आंदोलक शेतकऱ्यांसोबत झालेली दडपशाही पोलिसांनी केली नसून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केली आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

मुंबई : कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे विदेशी शक्ती, आतंकवादी असल्याचा आरोप केला जातो. पण हे कायदे मागे न घेण्यामागेही विदेशी भांडवलशाहीचा दबाव असल्याचा आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे मान्य केल्यास त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहू, असा टोलाही त्यांनी लगावला.

दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तर प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. पण या मोर्चादरम्यान दिल्लीत मोठा हिंसाचार झाला. त्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांना हटविण्यासाठी बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. यावर बोलताना बच्चू कडू यांनी पंतप्रधानांवर सरकारवर टीका केली.

ते म्हणाले, दिल्लीत 26 जानेवारीला आंदोलक शेतकऱ्यांसोबत झालेली दडपशाही पोलिसांनी केली नसून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केली आहे.  या आंदोलनामागे विदेशी शक्ती, आतंकवादी आहेत, असे सरकार म्हणते. पण हे कायदे मागे न घेण्यामागे सुद्धा विदेशी शक्तींचाच दबाव आहे. विदेशी शक्ती एकत्र येऊन मोदींना टार्गेट करत आहेत. हे त्यांनी स्पष्टपणे सांगावे. आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहु, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.

मागील दोन महिन्यापासून  सुरू असलेल्या आंदोलनात २५ लोकांनी बलिदान दिले आहे. तरीही कायदे मागे न घेण्यामागे काय कारण आहे?, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. कायदे मागे घेतले तर शेतकऱ्यांचे काय आर्थिक नुकसान होणार आहे, हे स्पष्ट करावे. कारण विदेशी भांडवलशाहीचा दबाव मोदींवर यांच्या वर आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.

सिंघू सीमेवर तणाव...

दिल्लीच्या सिंघू सीमेवर स्थानिक व आंदोलक शेतकरी आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूने दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसेच पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. स्थानिकांनी पोलिसांचे टेंट तोडल्याचेही समजते. गुरूवारपासून शेकडो स्थानिक दिल्लीच्या सीमेवर जमा होत आहेत. हिंसाचारानंतर या स्थानिकांनी शेतकऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख