'राष्ट्रपती राजवट' ही मागणी जुनीच... - presidential reign is bjp's old demand  | Politics Marathi News - Sarkarnama

'राष्ट्रपती राजवट' ही मागणी जुनीच...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 मार्च 2021

आतापर्यंत ८-९ वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत भाजपकडून मागणी केली गेली. दर महिन्याला एक-दोन वेळा हा प्रस्ताव सादर केला जात असून यात नवे काहीच नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी दिली. 

मुंबई: महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची सत्ता स्थिर असून राज्य सरकारला कोणताही धोका नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, ही मागणी विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. ही मागणी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर करण्यात येत नसून ही मागणी जुनीच आहे. आतापर्यंत ८-९ वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत भाजपकडून मागणी केली गेली. दर महिन्याला एक-दोन वेळा हा प्रस्ताव सादर केला जात असून यात नवे काहीच नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी दिली. 

 

 

राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीर सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच पत्र लिहिले. यात त्यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर आस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना निधी गोळा करण्यासाठी सांगत. या लेटरबाँबमुळे चारही बाजूंनी ठाकरे सरकार कोंडीत सापडली असतानाच राष्ट्रवादीचे नेते मात्र बचावात्मक पावित्रा घेत असल्याचे दिसते. 

लेटरबाँबच्याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील पुढे बोलताना म्हणाले, मंत्रीमंडळात कोणत्याही बदलांची आवश्यकता नसून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा सुरू आहे. तपशीलात जाऊन तपासणी करण्यात येईलच. अनिल देशमुख यांची पाठीराखण करण्याचा प्रश्नच नसून जे सत्य आहे, ते लोकांसमोर येईलच. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रश्न येत नसून ठाकरे सरकार पूर्णपणे स्थिर आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख