गोपाळ शेट्टींचे राममंदिर कार्यक्रमांऐवजी क्रीडासंकुल मंजुरीच्या बैठकीस प्राधान्य 

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्तच्या स्थानिककार्यक्रमांना हजेरी लावायची की उत्तर मुंबईतील मोठ्या क्रीडा संकुलाच्या बैठकीला महत्व द्यायचे, या पेचात पडलेल्या खासदार गोपाळ शेट्टींनी बुधवारी (ता. 5 ऑगस्ट) अखेर लोकहिताला प्राधान्य दिले. त्यामुळे उत्तर मुंबईला 13 एकर क्षेत्रावरचे अवाढव्य क्रीडा संकुल लगेच मिळाले.
Preference for Gopal Shetty's sports complex approval meeting instead of Ram Mandir programs
Preference for Gopal Shetty's sports complex approval meeting instead of Ram Mandir programs

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्तच्या स्थानिक कार्यक्रमांना हजेरी लावायची की उत्तर मुंबईतील मोठ्या क्रीडा संकुलाच्या बैठकीला महत्व द्यायचे, या पेचात पडलेल्या खासदार गोपाळ शेट्टींनी बुधवारी (ता. 5 ऑगस्ट) अखेर लोकहिताला प्राधान्य दिले. त्यामुळे उत्तर मुंबईला 13 एकर क्षेत्रावरचे अवाढव्य क्रीडा संकुल लगेच मिळाले. 

या क्रीडा संकुलासाठी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी प्रयत्नशील होते. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्याबरोबर बुधवारी झालेल्या बैठकीत या क्रीडा संकुलाला मान्यता देण्यात आली. राम मंदिराचे भूमिपूजन व या बैठकीची वेळ एकच आल्याने शेट्टी यांच्यासमोर पेच निर्माण झाला होता. मात्र, शेट्टी यांनी आधी या बैठकीला हजेरी लावून नंतर राम मंदिराच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.

कांदिवली (प.) परीसरातील महावीर नगरात 48 हजार चौरस मीटर एवढ्या जागेवर (स्व.) प्रमोद महाजन यांच्या नावाने हे भव्य शासकीय क्रीडासंकुल उभारण्यात येणार आहे. येथील वसतिगृहात सुमारे चारशे खेळाडूंची राहण्याची सोय करून त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. 

पहिल्या टप्प्यात या संकुलाची संरक्षक भिंत, मुख्य प्रवेशद्वार, जॉगिंग ट्रॅक, स्वच्छतागृह, दिवे आदींची निर्मिती होईल. या क्रीडासंकुलाचे भूमिपूजन पुढील महिन्यात होणार आहे. या संकुलाच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकार 40 कोटी रुपये खर्च करणार आहे. दुसऱ्या टप्यासाठी शासकीय अनुदान अपुरे पडले, तर पीपीपी मॉडेलमार्फत हे काम पूर्ण केले जाईल.

हा प्रस्तावही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्याचा आराखडा ठरवून खर्च निश्‍चित झाल्यावर ते पैसे कसे उभे करायचे, हे ठरविले जाईल. त्या दुसऱ्या टप्प्यासाठी दोनशे कोटींच्या खर्चाचा अंदाज आहे, असे गोपाळ शेट्टी यांनी सांगितले. 

"म्हाडा'च्या या जमिनीवर इनडोअर व आउटडोअर संकुले उभारून वेगवेगळे खेळ खेळण्याची व्यवस्था होईल. व्हॉलीबॉल, लॉन टेनिस, बॅडमिंटन, बॉक्‍सिंग, रायफल शुटिंग याचबरोबर कबड्डी, खोखो हे देशी खेळदेखील येथे खेळले जातील. त्याचबरोबर फुटबॉलचे क्रीडांगण आणि धावण्याचा सुसज्ज ट्रॅक देखील केला जाईल. फ्लडलाईटमुळे रात्रीही सराव करता येईल.

जवळपास सर्व खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा येथे मिळणार आहेत. हे सारे बांधकाम पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागतील. गोपाळ शेट्टी यांनी नुकतेच कांदिवली पूर्व येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (स्व.) अटलबिहारी वाजपेयी नॅशनल सेंटर ऑफ एक्‍सलन्स क्रीडा संकुलाच्या विस्ताराचे कामही मार्गी लावले होते. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com