pravin darekar demands fast track court for roha and chakan cases | Sarkarnama

रोहा, चाकण येथील अत्याचार प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टात चालवा: दरेकर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 29 जुलै 2020

गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी दरेकर यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालयात भेट घेऊन केली.

मुंबई : रोहा तालुक्यातील तांबडी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खून तसेच चाकण येथील एका युवतीचा खून केल्याच्या प्रकरणांमध्ये पीडीतांना लवकर न्याय मिळावा, यासाठी हे खटले फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात येतील, तसेच या दोन्ही प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना दिले.  

गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी दरेकर यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालयात भेट घेऊन केली. सामान्यपणे न्यायालयात सुनावणीस पुष्कळ वेळ लागतो, त्यामुळे पीडितांना लवकर न्याय मिळण्यास विलंब होतो. म्हणून या दोन्ही प्रकरणांची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात घेण्यात यावी. तसेच त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने दोन्ही प्रकरणात विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणीही दरेकर यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याकडे केली. याप्रकरणी सविस्तर चर्चा झाल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी या प्रकरणांची दखल घेत या दोन्ही प्रकरणांसाठी सकारच्यावतीने विशेष सरकारी वकील उपलब्ध करुन देऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात घेण्यात येईल असे सांगितल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

धनंजय मुंडे यांचीही घेतली भेट

मुंबई : सिध्दार्थ महाविद्यालयाच्या आनंदवन इमारतीच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन आज सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. 

या प्रश्नावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे आश्वासन दिले. 

तसेच सिद्धार्थ कॉलेजच्या मोडकळीस आलेल्या या वास्तूची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करण्याचेही मुंडे यांनी यावेळी मान्य केले. या शिष्टमंडळामध्ये आमदार भाई गिरकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, मुंबई आरपीआय युवाचे अध्यक्ष रमेश गायकवाड,  सिध्दार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य यु. एम. म्हस्के आदींचा समावेश होता. दरेकर यांनी सिध्दार्थ महाविदयालयाच्या वास्तूच्या दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच या वास्तूची काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पाहणी केली होती.

फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेजच्या इमारतीत अनेक ठिकाणी पाणी गळत असून त्यामुळे इमारतीलाही धोका निर्माण झाला आहे. या इमारतीच्या विकासकामाचा सुमारे नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव सव्वा वर्षापासून मंत्रालयात प्रलंबित आहे, यासंदर्भांत आज ही बैठक झाली. हा निधी तात्काळ मिळाला नाही तर महाविद्यालयासमोर धरणे धरण्याचा इशाराही दरेकर यांनी दिला होता.

 Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख