तहान लागली की विहीर खोदायची, केंद्र सरकारवर खापर फोडायचे.. ठाकरे सरकारचा हा पोरखेळ - Praveen Darekar criticizes the state government Oxygen | Politics Marathi News - Sarkarnama

तहान लागली की विहीर खोदायची, केंद्र सरकारवर खापर फोडायचे.. ठाकरे सरकारचा हा पोरखेळ

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 एप्रिल 2021

केंद्रावर खापर फोडण्याचा एककलमी कार्यक्रम रकारकडून सुरू असल्याची   टीका  प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

मुंबई : कोरोनाशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राला झुकतं माप दिलं असतानाही तहान लागल्यावर विहीर खणून उलट केंद्रावर खापर फोडण्याचा एककलमी कार्यक्रम राज्यसरकारकडून सुरू असल्याची जोरदार टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

आपलं अपयश सांगता येत नाही म्हणून केंद्राकडे बोट दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्य सरकारकडून वारंवार केला जातो आहे. फक्त केंद्रावर टीका करण्यापेक्षा राज्य सरकारने कोरोना काळात आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी नेमकं काय केलं, याची आकडेवारी सर्वांसमोर आणावी, असा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर "आम्ही केंद्राच्या पाया पडायला तयार आहोत, पण केंद्राने राज्याला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी मदत करावी", अशी उपरोधिक विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला केली आहे. टोपे यांच्या या वक्तव्यावर  दरेकर यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले आहे.  
 
केंद्र सरकारविरोधात खडे फोडल्याशिवाय राज्यातल्या मंत्र्यांचा एकही दिवस जात नाही. केंद्रानं दीड हजार मेट्रिक टन ऑक्सिजन देण्याची तयारी लगेच दाखवली होती. पण हा ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकार विशेष विमाने किंवा 32 टँकरही उपलब्ध करुन देऊ शकले नाही. ही जबाबदारी देखील सरकार पार पाडू शकले नाही, अशी टीका दरेकर यांनी केली.
     
महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा पूर्ण अभाव आहे. राजेश टोपे 36 हजार इंजेक्शनची आवश्यकता असल्याचे सांगतात तर नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड हे पन्नास हजारांचा आकडा ठोकतात आणि संजय राऊत 80 हजार इंजेक्शनची गरज असल्याचे फुशारकीने सांगतात. आज राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही आणि आयसीयू बेडस, व्हेटीलेटर उपलब्ध होत नाहीत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकारने काय नियोजन केले, याचे उत्तर देण्याऐवजी राज्यातील मंत्री केंद्रावर जबाबदारी ढकलत आहेत, अशी टीका दरेकर यांनी केली.
       
ऑक्सिजन तुटवडा एका दिवसात निर्माण झाला नाही. रुग्ण वाढत असताना तुटवडा निर्माण होऊ शकतो, हे वेळीच ओळखून जर सरकारने नियोजन केले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. पण प्रत्येक बाबतीत तहान लागली की विहीर खोदण्याचे नाटक करायचे आणि केंद्र सरकारवर खापर फोडायचे, असा पोरखेळ महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे. तो थांबला पाहिजे, असेही दरेकर म्हणाले. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख