पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी नबाव मलिकांचा राठोडांना 'हा' सल्ला...  - Pooja Chavans death case Nawab Maliks advice to sanjay Rathore | Politics Marathi News - Sarkarnama

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी नबाव मलिकांचा राठोडांना 'हा' सल्ला... 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड अडचणीत सापडले आहेत.

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड अडचणीत सापडले आहेत. त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे राठोड गुरूवारी यावर खुलासा करण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राठोडांना खुलासा न करण्याचा सल्ला दिला आहे. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारला घेण्यात आले आहे. वनमंत्री संजय राठोड हेच पूजाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरही दबाव वाढला आहे. राठोड यांच्या समर्थनार्थ यवतमाळमध्ये मोर्चाही काढण्यात आला.

राठोड हे गुरूवारी पोहरादेवी येथे माध्यमांसमोर आपली बाजू मांडणार असल्याचे समजते. त्याअनुषंगाने बोलताना मलिक म्हणाले, राठोड यांच्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ते जिथे तिथे असतील. चौकशीतून सर्वकाही समोर येईल. ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल. ते नेत्यांच्या संपर्कात असून त्यांची कामे करत आहेत. या प्रकरणात राठोड यांनी खुलासा करू नये, असा सल्ला मलिक यांनी दिला.

खुलासा केला तर नवीन प्रश्न निर्माण होतात. पोलिस तपासातून सत्य समोर येईल. पूजा चव्हाण हिच्याशी राठोडांचे चुकीच्या पध्दतीने नाते जोडू नये. चौकशीतून या गोष्टी समोर येऊ द्या. त्यांच्यात वेगळे नाते असते तर मुलीने आई वडिलांबरोबरचा त्यांचा फोटो ठेवला नसता, असेही मलिक म्हणाले. 

आशिष शेलारांवर पलटवार...

भाजप नेते आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्यावर कोरोना लशीसंदर्भात टीका केली आहे. मलिक यांनी लोकांना लस न घेण्याचे आवाहन केल्याचे ते म्हणाले होते. त्यावर बोलताना मलिक म्हणाले, मी कधी कोणाला लस घेऊ नका असे आवाहन केलेले नाही. माझी बहिण डॉक्टर असून तिला कॉल आल्यानंतर तिने लगेच लस घेतली आहे. लसीबाबत लोकांच्या मनात असलेली भिती ती दूर झाली पाहिजे. जगात सर्व राष्ट्र प्रमुखांनी आधी लस घेतली त्याप्रमाणे पंतप्रधानांनी लस घेऊन लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा, असे मलिक म्हणाले.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख