'ते' रेमडेसिविर सरकारलाच मिळणार होते..शिंगणेंचा धक्कादायक खुलासा..आघाडीच्या नेत्यांची कोंडी - politics ncp rajendra shingane remdesivir bjp pravin darekar | Politics Marathi News - Sarkarnama

'ते' रेमडेसिविर सरकारलाच मिळणार होते..शिंगणेंचा धक्कादायक खुलासा..आघाडीच्या नेत्यांची कोंडी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 एप्रिल 2021

भाजपच्या प्रयत्नांनी जे रेमडेसिविर येणार होते, ते सरकारलाच मिळणार होतं.

मुंबई :  राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असे असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनावरून राजकारण तापलं आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिविर  इंजेक्शन महाराष्ट्राला मिळणार होते, असा धक्कादायक खुलासा केला आहे. 

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून याबाबत जे दावे केले जात होते, ते आता उघड झाले आहे. त्यांच्याच मंत्र्यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचीच कोंडी झाली आहे. भाजपच्या प्रयत्नांनी जे रेमडेसिविर येणार होते, ते सरकारलाच मिळणार होतं, ही बाब स्वतः शिंगणे यांनी मान्य केली आहे. याबाबत वेगळे राजकारण झाले पण माझा प्रयत्न रेमडेसिविर मिळविण्याचा होता, असे शिंगणे म्हणाले. भाजपच्या भूमिकेला मंत्र्यांकडून दुजोरा मिळाला आहे. 

डॅा. शिंगणे म्हणाले की मागील आठवड्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत मला भेटले, निवेदन दिलं. निर्यातदारांकडे साठा होता तो संकटकाळात राज्याला मिळत असेल या स्वच्छ हेतूने अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने त्यांना परवानग्या दिल्या. त्यानंतर कंपन्या त्यांच्याकडील साठा राज्य सरकारलाच देऊ शकत होते इतर कोणालाही देऊ शकत नव्हते. पण मधल्या काळात घडामोडी झाल्या त्यात वेगळं राजकारण झालं. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हातात हात घालून कोरोनाचा मुकाबला केला पाहिजे, मला यावर जास्त काही बोलायचं नाही.  

''डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे मनापासून अभिनंदन. त्यांनी रेमडेसिवीरचे सत्य सांगितल्यामुळे नवाब मलिक, प्रियांका वाडरा, साकेत गोखले, आव्हाड या सगळ्या खोटरड्यांचे पितळ उघडे पडले, '' असे टि्वट करुन भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला आहे. 

Edited by: Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख