काँग्रेस प्रदेशाअध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार.. - Politic Maharashtra congress new state president will be announce soon nana patole rajiv satav sunil kedar yashomati-thakur-in-race | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेस प्रदेशाअध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 6 जानेवारी 2021

काँग्रेस प्रदेशाअध्यक्षपदाच्या नावाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. काल रात्री उशिरापर्यंत मुंबईत याबाबत चर्चा सुरू होती. 

पुणे : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कोण्याच्या गळ्यात पडते, याकडे सगऴ्याचे लक्ष आहे. काँग्रेस प्रदेशाअध्यक्षपदाच्या नावाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. काल रात्री उशिरापर्यंत मुंबईत याबाबत चर्चा सुरू होती. 

प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आहे. काल या नावावर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात  पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा या प्रमुख नेत्यांबरोबर याबाबत चर्चा केली.

कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्ष कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर ही नावे समोर आली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या असल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाचा भार कमी करण्यात यावा, अशी इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. मात्र, काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी तरुण नेत्याला संधी द्यावी. आम्ही त्याच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहू, असे थोरात यांनी सांगिलतले होते.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्याशी मंगळवारी एच. के. पाटील यांनी याबाबत चर्चा केली आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाने आदेश दिल्यास त्या प्रमाणे काम करण्याची आपली तयारी असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले. थोपटे यांची निवड झाल्यास संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या साठ वर्षानंतर पुण्याला प्रथमच संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

याबाबत नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, पक्षाकडे काहीही मागायचे नाही, हे मी ठरवले आहे. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्ष होणार, नाही होणार, याबाबत काहीही सांगू शकत नाही. पण पक्षाने ती जबाबदारी दिल्यास निश्चितपणे पार पाडीन, असे सूचक उत्तर त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिले. त्यामुळे त्यांची प्रदेशाध्यक्ष होण्याची सुप्त इच्छा आता लपून राहिली नाही. जेव्हा त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले, तेव्हाही यापेक्षा ते प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात होते. पण पक्षाने जबाबदारी दिल्यामुळे ते विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. 

प्रदेशाध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा असल्याचे मला माध्यमातील बातम्यांमधूनच समजले. मात्र, पक्षाने कोणताही आदेश दिला तर त्याप्रमाणे काम करण्याची आपली तयारी असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले. थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार झाले आहेत. त्यांचे वडिल अनंतराव थोपटे हे  कडवे काॅंग्रेसनिष्ठ म्हणून ओळखले जातात. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक वर्षे विविध खाती सांभाळली होती. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख