परदेशातून  येणाऱ्या प्रवाशांकडून पैसेघेऊन विलगीकरणातून सूट, बीएमसीची मोठी कारवाई 

परदेशातून येणाऱया प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून सूट देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसे घेऊन चुकीच्या आणि अवैध पद्धतीने सूट देण्यात येत होती.
Mumbai .jpg
Mumbai .jpg

मुंबई : मंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. परदेशातून येणाऱया प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून सूट देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसे घेऊन चुकीच्या आणि अवैध पद्धतीने सूट देण्यात येत होती.

हा प्रकार लक्षात येताच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हे कृत्य करणार्या दुय्याम अभियंत्यास तत्काळ निलंबित केले. प्रकाराची तातडीने चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. याप्रकरणी मनपा कर्मचाऱयासह एकूण तीन जणांविरुद्ध महानगरपालिका प्रशासनाने पोलिसात फिर्याद देखील दाखल केली आहे. 

ब्रिटन (यूके) मध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यानंतर त्याचा फैलाव रोखण्यासाठी सजगता म्हणून राज्य सरकारसह बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कठोर उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती दिनांक २१ डिसेंबर २०२० पासून लागू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून युकेसह, इटाली, दक्षिण आफ्रिका, युरोप व मध्य-पूर्व देशांमधून हवाई मार्गे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळावर येणाऱया प्रवाशांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. 

त्यासाठी विमानतळावर महानगरपालिका प्रशासनाने कर्मचाऱयांची तीन पाळ्यांमध्ये नियुक्तीदेखील केली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, बेस्ट, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचेही कर्मचारी मदतीला नेमण्यात आले आहेत. मुंबई विमानतळावर उपरोक्त ठिकाणांहून आतापर्यंत सुमारे ४९ हजार ३६२ प्रवासी दाखल झाले आहेत. या प्रवाशांना योग्यरित्या संस्थात्मक विलगीकरण देखील करण्यात आले आहे.

दरम्यान, विलगीकरणातून सूट देण्याबाबतच्या नियमांचे पालन करताना काही अयोग्य घडत असल्याची बाब लक्षात आल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्वतःहून विमानतळ प्रशासनासह संबंधिताना बारकाईने देखरेख करण्याबाबत गोपनीय पत्र दिले. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) ला देखील सतर्क करण्यात आले. त्यानंतर हा गैरप्रकार उजेडात आला.

विमानतळावर कर्तव्यार्थ नेमलेल्या महानगरपालिकेच्या सेवेतील दुय्यम अभियंता (वास्तूशास्त्रज्ञ) दिनेश एस. गावंडे हा विमानतळावर विदेशातून येणाऱया प्रवाशांना चुकीच्या व अवैध पद्धतीने संस्थात्मक विलगीकरणातून सूट देत असल्याची, तसेच त्याला अन्य दोघे मदत करत असल्याची बाब केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) यांनी हेरली. 

हा प्रकार त्यांनी रात्रपाळीवर कर्तव्यार्थ असलेले सत्रप्रमुख तथा महानगरपालिकेच्या एच/पश्चिम विभागातील कार्यकारी अभियंता वकार जावेद हफिझ यांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकाराची तातडीने दखल घेऊन हफिझ यांनी दिनेश गावंडे यांना विचारणा केली. तसेच सीआयएसएफच्या मदतीने झडती घेवून त्याच्याकडून बनावट शिक्के व रक्कम जप्त केली.

यामध्ये अन्य आस्थापनांचे दोघे देखील संशयित म्हणून आढळले आहेत. गावंडे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या चुकीच्या कामकाजाबाबत घटनास्थळी पंचनामा करुन, साक्षी नोंदवून प्राथमिक अहवाल हा महानगरपालिकेचे उपआयुक्त (भूसंपादन) तथा विमानतळ उपाययोजनांचे प्रमुख अनिल वानखेडे यांना सुपूर्द करण्यात आला. 

घडल्या प्रकाराची तीव्रता पाहता तसेच प्राथमिक अहवाल आणि उपलब्ध पुरावे, तसेच साक्षीदारांचे लिखित यांच्या आधारे महानगरपालिका प्रशासनाने दिनेश गावंडे यांस (१५ जानेवारी) रोजी तत्काळ निलंबित केले. तसेच या प्रकरणाची तातडीने चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने गावंडे याच्यासह एकूण ३ जणांविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात फिर्याद (क्रमांक ०१३५०१२) देखील नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी गावंडेसह तिन्ही संशयितांना अटक केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com