`मनसुखच्या शवविच्छेदनाच्या वेळी पोलिस निरीक्षक सचिन वाझे हजर`

मनसुख हिरेनच्या मृत्यूप्रकरणाचाे राजकीय पडसाद
sachin waze
sachin waze

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणावरून राजकीय वाद सुरू झाला असून या साऱ्या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत आज केले. मनसुख याच्या मालकीच्या गाडीत जिलेटिन भरून ती उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅंटिलिया या अलिशान निवासस्थानी केली होती. या गाडी प्रकरणाचा तपास क्राईम ब्रॅंचचे पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडे होता. हा तपास एनआयएकडे (राष्ट्रीय तपास संस्था) द्यावा, या मागणीवरून विधानसभेत शाब्दिक चकमक उडाली.

यानंतर हा तपास एसटीसकडे देण्याची घोषणा देशमुख यांनी केली. त्यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी देशमुख यांना लक्ष्य केले. ``मानसुख यांच्या मृत्यूचा तपास एटीएसकडे दिल्याचे कळाले. ठाणे आणि मुंबईच्या पोलिसांच्या शौर्यगाथा सांगणाऱ्या गृहमंत्र्यांना अर्ध्या तासतात असे काय सुचलं की त्यांनी अचानक एटीएसकडे तपास दिला. या मृत्यूत काळबेर आहे,`` असा आरोप शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

``सगळ्या घटना या सचिन वाझेंभोवती फिरतात. मनसुख यांच्या शवविच्छेदनाच्या वेळीही वाझे उपस्थित आहेत, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. ते का तिथे उपस्थित आहेत? यामुळे संशय बळावतोय. सरकारच्या तपासाच्या दिशेविषयी संशय वाढत आहे. त्यामुळे तपास हा एनआयएकडे जायला हवा. वाझे हा क्राॅफर्ड मार्केटला मनसुख यांना भेटला. वाझे ठाणे पोलिसांत नियुक्तीस नाही. ते एटीएसमध्ये नाहीत. तरीही ते शवविच्छेदनाला का उपस्थित आहेत, असा सवाल त्यांनी विधानसभेतही विचारला. त्यांच्या या मागणीवरून सभागृहाच कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. 

कोण आहेत सचिन वाझे?

 मुंबई क्राईम ब्रॅंचचे अधिकारी पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचे नाव विधानसभेत गाजले. गृहमंत्री अनिल देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, आशिष शेलार, सुधीर मुनगंटिवार यांच्या तोंडी वाझेंचे नाव आले.

त्याला कारणही घडले ते प्रसिद्ध उद्योगपती व रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया बंगल्याजवळ 25 फेब्रुवारीला संशयित गाडी आढळून आलेल्या गाडीचे. त्या गाडीत जिलेटीनच्या 25 कांड्याही सापडल्या होत्या. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब आज समोर आली. वाझे आणि मनसुख हिरेन यांचे या आधी फोनवरून संभाषण झाले होते. या प्रकरणातील हिरेन हा महत्वाचा दुवा होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. सचिन वाझे यांच्याकडून या प्रकरणाचा तपास का काढण्यात आला, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नांवरून सभागृहात शाब्दिक चकमक उडाली.


सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केले होते. 

मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. यामध्ये सचिन वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. या घटनेनंतर वाझे यांनी 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र, तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर त्यांनी 2008 च्या दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला होता.  

सचिन वाझे यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावर `जिंकून हरलेली लढाई` नावाचे पुस्तक मराठीत लिहिले होते. शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेविड हेडली यांच्यावरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत.

 पोलिस दलात असताना वाझे यांनी सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणूनही त्यांनी काम केले. वाझेंनी एक अ‍ॅपही तयार केले होते. ते एका एनजीओमध्ये कामही करत होते. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते. 

नव्वदच्या दशकातील एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी ख्याती सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांची होती. महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावरून वाद निर्माण झाला होता. इंटेरिअर डेकोरेटर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी गोस्वामी यांना वाझे यांनी अटक केली होती. या अटकेमुळे वाझेंवर भाजप नाराज आहे का, असा सवालही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत विचारला. त्यानंतर वाझेंचे नाव अनेक नेत्यांच्या ओठी आले. गेली अनेक वर्षे काही ना काही कारणांमुळे चर्चेत असलेले वाझे त्यामुळे विधानसभेतही गाजले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com