तुमची लायकी जनतेने दाखवून दिलीय  - People have shown your worthiness: Vinayak Raut | Politics Marathi News - Sarkarnama

तुमची लायकी जनतेने दाखवून दिलीय 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

नाव न घेता दिलेले उदाहरण जस काही माझ्यासाठीच आहे. हा ठाम विश्वास एका गृहस्थाला झाला

रत्नागिरी : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. बेडूक आणि त्याची पिल्लं याचे एक उदाहरण कोणाचंही नावं न घेता दिलं. नाव न घेता दिलेले उदाहरण जस काही माझ्यासाठीच आहे. हा ठाम विश्वास एका गृहस्थाला झाला आणि त्या गृहस्थाने आज पुन्हा एकदा डराव...डराव... गिरी करायला सुरुवात केलेली आहे, अशी बोचरी टीका खासदार विनायक राऊत यांनी राणे यांच्यावर केली. 

नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर ही प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले, ""मी एक सांगू इच्छितो की जरी पावसाळा संपला असला तरीसुद्धा हे डराव डराव करण्याची डराव गिरी संपलेली नाही, परंतु यांच्या डराव गिरीने कोणी डरत नाही, कोणी घाबरत नाही. कारण यांना यांची लायकी काय आहे, ती यापूर्वीच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जनतेने दाखवून दिलेली आहे. म्हणून नारायण राणे यांना मला एकच सांगायचे आहे. तुम्हीही मुख्यमंत्री होता. मात्र, ज्या अश्‍लाघ्य भाषेमध्ये तुम्ही बोललात, त्यामुळे तुमच्या त्या मुख्यमंत्री पदाला काळिमा फासला आहात. तुम्हाला पुन:श्‍च एकदा तुमची लायकी या महाराष्ट्रातील जनता नक्की दाखवणार.'' 

एकेरी उल्लेख, शिवराळ भाषा वापरत राणेंकडून टीका 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. अरेतुरेच्या भाषेत, एकेरी शब्दांत राणेंनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला. अनेक शिवराळ शब्द त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल वापरले. 

राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की आदित्य ठाकरे यांना क्‍लिन चिट देण्यासाठीचे कालचे भाषण होते. देशात सर्वात जास्त 43 हजार रूग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे. मात्र त्याचा काहीही उल्लेख केला नाही. याची जबाबदारी नैतिक म्हणून मुख्यमंत्र्यांवर येतो. राज्य दिवाळखोरीच्या उंबरट्यावर आहे हे कळत नाही. उद्धव ठाकरे हा माणूस मुख्यमंत्री पदासाठी अजिबात लायक नाही. पंतप्रधानांबद्दल बोलायची लायकी उद्धव ठाकरे यांची नाही. मुख्यमंत्र्यांचे कालच भाषण म्हणजे शिवराळ बडबड करणे होते. अशा प्रकारे भाषण कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केल नव्हते, अशी टीका त्यांनी केली. 

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत, असे शिवसैनिकांनाही वाटत नाही. शिवसेनेच्या नेत्यांचीही कामे होत नाही. पुढील वेळी शिवसेनेचे 10 ते 15 आमदार येतील, असा अंदाज राणेंनी व्यक्त केला. मराठा समाजाला ठाकरे कधीच आरक्षण देऊ शकत नाही. कायदा,घटना काहीही माहीत नाही. हा बुद्धू मुख्यमंत्री आहे. काहीही अक्कल नाही याला. कालचा मेळावा द्वेषाने केला होता. आमचा तोल गेला तर आम्ही "मातोश्री'ची आतमधील सर्व माहिती बाहेर काढू. आम्हाला काय दादागिरी दाखवतो? लायकी आहे तुझी? गांडूळासारखी भूमिका बजावली निवडणुकीच्या वेळी, अशी भाषा त्यांनी वापरली. 

नारायण राणे यांच्याप्रमाणे त्यांचे पुत्र आमदार नीतेश आणि माजी खासदार नीलेश या दोघांनीही शिवसेनेवर जोरदार टीका केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख