परमबीरसिंह यांना अटकेपासून पुन्हा दिलासा - Parambir Singh' petition will be heard on June 22 | Politics Marathi News - Sarkarnama

परमबीरसिंह यांना अटकेपासून पुन्हा दिलासा

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 14 जून 2021

परमबीरसिंग यांच्याविरोधात अॅट्रोसिटिचा गुन्हा पोलिस निरीक्षक घाडगे यांनी दाखल केला आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग विरुद्ध राज्य सरकार (Parambirsingh Vs State of Maharashtra) यांच्यातील न्यायालयीन सामना रोज वेगवेगळी वळणे घेत आहे. परमबीरसिंह यांना उच्च न्यायालयाकडून मिळालेला अटकेपासूनचा दिलासा 22 जूनपर्यंत कायम राहणार आहे. या प्रकरणाची सुनावणी घेत असलेले न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांचे कोर्ट सोमवारी (ता.१४ जून) कामकाजासाठी उपलब्ध नसल्याने ही सुनावणी आता 22 जूनला होणार आहे.  (Parambir Singh' petition will be heard on June 22)

दरम्यान, परमबीरसिंग यांच्याविरोधात अॅट्रोसिटिचा गुन्हा पोलिस निरीक्षक घाडगे यांनी दाखल केला आहे. परमबीरसिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना घाडगे हे तेथे पोलिस निरीक्षक होते. परमबीरसिंग यांचे चुकीचे आदेश न ऐकल्याने माझ्याविरोधात त्यांनी कुभांड रचल्याची तक्रार त्यांनी केली. तसेच परमबीरसिंग यांच्या वर्तणुकीबद्दल, त्यांच्या संपत्तीबद्दल मोठे आरोप त्यांनी केले. त्यानंतर अकोला येथे झिरो नंबरने त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला. त्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सुरू केला आहे.  हा गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी परमबीरसिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटिकालीन खंडपीठापुढे याचिका दाखल केली आहे. 

 हे ही वाचा : जळगावमध्ये संजय राऊतांच्या विधानाची ठिणगी!

या आधी खंडपीठाने परमबीरसिंह यांना पुढील सुनावणी होईपर्यंत अटक करू नये, असा आदेश दिला होता. तो पुन्हा आता २२ जून पर्यंत कायम आहे.  परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आरोप केल्याने राज्य सरकारने सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल केल्याचा मुद्दा जेठमलानी यांनी न्यायलयात मांडला होता. परमबीर यांची चौकशी करणारे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी माघार का घेतली?

कारण परमबीर यांना त्यांनी थेट सांगितले होते की व्यवस्थेविरोधात जाऊ नका, तुमच्याविरोधात एकापाठोपाठ एक खटले भरू. याचे रेकॉर्डिंग बाहेर आले आणि पांडे यांनी माघार घेतली. तरीही परमबीरसिंह यांच्याविरोधात गुन्हे दाखल होणे सुरूच आहे. प्रकरणी पाच वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. इतकी वर्ष त्यांच्याकडे एक तक्रार म्हणून का पाहण्यात आले नाही, आता अचानक गुन्हा दाखल झाला? हे गुन्हे निव्वळ परमबीरसिंह यांच्यावर सूड उगवण्यासाठीच दाखल झालेत, असा मुद्दा त्यांनी मांडला होता.

हे ही वाचा : बीड जिल्ह्यात येणारा विकास निधी गावांपर्यंत जात नाही; क्षीरसागरांची ठाकरेंकडे तक्रार...

घाडगे यांनी परमबीरसिंग यांच्याविरोधात चार-पाच वर्षांपूर्वीच तक्रार केलेली होती. त्यामुळे सरकारची सूडबुद्धी नाही. हा गंभीर गुन्हा असल्याने त्यांना अटकेपासून संरक्षण देता येत नाही, असे खंबाटा यांनी सरकारच्या वतीने सांगितले होते. त्यांचा युक्तिवाद सुरू असतानाच रात्री बाराचे ठोके घड्याळात वाजले. न्यायालयाने बारा वाजले असल्याने आम्ही आमचे काम थांबवतो. तोपर्यंत सरकारने परमबीरसिंग यांना अटक करू असे म्हटले होते. त्यावर आज सुनावणी होणार होती. मात्र, कोर्ट उपलब्ध नसल्याने ही सुनावणी होऊ शकली नाही.   
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख