अर्णब गोस्वामीच्या सुटकेच्या वेळी घोषणा देण्यासाठी भाडोत्री माणसे? - paid workers to give slogans in support of Arnab Goswami is the question | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णब गोस्वामीच्या सुटकेच्या वेळी घोषणा देण्यासाठी भाडोत्री माणसे?

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

त्या व्हिडीओचा सोशल मिडियावर धुमाकूळ 

खारघर : अर्णब गोस्वामीच्या सुटकेच्या वेळी जमलेल्या गर्दीतील काहींना पैसे देऊन आणल्याचा दावा काही तरुण करीत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता. 11) सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. त्यांची तळोजा कारागृहातून सुटका झाली. अर्णब यांच्या सुटकेवेळी काही बुरखाधारी महिला आणि लहान मुलांना घेऊन आले होते. त्यांच्यासोबत काही पत्रकार होते. आणलेल्या लोकांना हे पत्रकार पैसे देत असल्याचे प्रत्यक्षदर्शी काही व्यक्तींनी पाहिल्याचा व्हिडीओ युट्यूबद्वारे सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या युट्यूबवर काही नागरिक न्यायालयात अनेक किरकोळ गुन्ह्यात शिक्षा भोगत असून, त्यांना जामीन मिळत नाही. विशेषतः अर्णब गोस्वामी कारागृहातून बाहेर पडताना एका वाहनात बसून बोटाने व्ही (विजय) दाखवीत होते; मात्र ज्या वेळी जमलेले काही नागरिकांनी वंदे मातरमच्या घोषणा देत होते, त्या वेळी अर्णब गोस्वामी हे वाहनात उभे राहून वंदे मातरमच्या घोषणा देत होते. सुटकेच्या दिवशी गर्दी जमविण्यासाठी काही व्यक्तींना पैसे दिल्याचे काही तरुणांनी पाहिल्याचा दावा करीत असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.

एका वकिलाची रिपब्लिकला नोटीस

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यावर "रिपब्लिक टीव्ही'वर केलेल्या आक्षेपार्ह वार्तांकनामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे, असा आरोप करणारी कायदेशीर नोटीस एका वकिलाने "रिपब्लिक'ला पाठवली आहे.
उच्च न्यायालयाने दिलेला जामीन नाकारण्याचा निकाल हा या प्रकरणाच्या गुणवत्तेवर आधारित होता; मात्र या निकालाचे वार्तांकन करताना त्याला राजकीय रंग देण्यात आला, असे या नोटिसीमध्ये म्हटले आहे. उच्च न्यायालयात वकिली करणारे ऍड. सैफ आलम यांनी "रिपब्लिक मीडिया नेटवर्क'लाही नोटीस बजावली आहे.
उच्च न्यायालयातील सुनावणी आणि निकाल हा अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील कारस्थान आहे, असे विधान अँकरने केले होते. तसेच गोस्वामी यांना तुरुंगात टाकण्याच्या कारवाईत न्यायालय सहभागी होते, अशा स्वरूपाची विधाने केली होती. याबाबत संबंधित वृत्तवाहिनीने त्यांच्या वाहिनीवरच जाहीर माफी मागावी, अशी मागणी आलम यांनी नोटिसीमध्ये केली आहे.
न्यायालयाचा निकाल नकारात्मक पद्धतीने आणि चुकीच्या प्रकारे व्यक्त करून जनमानसात न्यायालयाची आणि न्यायमूर्तींची प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे संबंधित वाहिनीने माफी मागावी; अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू, असा इशारा दिला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सात दिवस गोस्वामी अलिबाग पोलिसांच्या कोठडीत होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख