सचिन वाझे सरकारचे जावई आहेत का ?..प्रविण दरेकर भडकले... - Opposition leader Praveen Darekar is aggressive over the arrest of Sachin Waze | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

सचिन वाझे सरकारचे जावई आहेत का ?..प्रविण दरेकर भडकले...

उत्तम कुटे 
बुधवार, 10 मार्च 2021

विरोधकांनी विधानपरिषदेत आज प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले. 

मुंबईः मुंबई पोलिस दलातील एपीआय (सहाय्यक पोलिस निरीक्षक) सचिन वाझे यांना मनसुख हिरेन प्रकरणी निलंबित करून अटक करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधानपरिषदेत आज प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले. 

"वाझे हा सरकारचा जावई आहे का" अशी संतप्त विचारणा करून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकार त्याला पुरावा नष्ट करण्यासाठी संधी देत असल्याचा आरोप केला. दरेकर यांच्या कायदा व सुव्यवस्थेच्या २६० च्या प्रस्तावावर कालपासून सभागृहात चर्चा सुरु आहे. आज ती प्रश्नोत्तराचा तास सुरु होण्यापूर्वी झाली. तिला उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेंची बदली गुन्हा शाखेतून (एटीएस) दुसरीकडे करून चौकशी सुरु केल्याचे सभागृहाला सांगितले. 

२०१९ च्या तुलनेत राज्यातील गुन्हेगारी कमी झाल्याचे ते एनसीआरबीच्या अहवालाच्या आधारे सांगू लागले. त्याला दरेकरांनी आक्षेप घेत आम्हाला आकडेवारीत इंटरेस्ट नाही, तर वाझेंवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यावर मोठा गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज पीठासीन अधिकारी तथा उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी पाच मिनिटासाठी तहकूब केले. ते पुन्हा सुरु होताच देशमुखांनी आपले उत्तराचे भाषण पुन्हा पुढे सुरु ठेवले. याप्रकरणी विरोधकांकडे पुरावे असेल, तर द्या, जावई असला, तरी त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, त्याला पाठीशी घालणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यावर समाधान न झालेल्या विरोधकांनी  "वाझे खूनी है, दादागिरी नही चलेगी" अशा घोषणा देत गोंधळ सुरुच ठेवला. देशमुखांच्या भाषणाला अडथळा आणत आम्हाला न्याय हवाय, सचिन वाझेला अटक झालीच पाहिजे, ही मागणी दरेकर यांनी लावून धरली. त्यातून पुन्हा मोठा गोंधळ झाला. घोषणाबाजी झाली. परिणामी कामकाज पुन्हा १५ मिनिटासाठी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्थगित केले. या गोंधळातच प्रस्तावावरील चर्चा थांबविण्यात आली.
 
त्यापूर्वी मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानाबाहेर स्फोटके सापडलेल्या मोटारीचा मालक मनसुख हिरेन याचा खून वाझे यांनीच केल्याचा आरोप त्याच्या पत्नीने पत्राव्दारे केल्याचे सांगत दरेकर यांनी वाझेंना  तातडीने निलंबित करून अटक करण्याची मागणी केली होती. तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असे सांगितले. वाझेंना पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार संधी देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते सरकारचे जावई आहेत का.. अशी विचारणा त्यांनी केली. जनतेचा या सरकारवर विश्वासच राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले.

''सचिन वाझेंना अटक झाली पाहीजे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ताबडतोब उत्तर द्यावं,'' अशी मागणीही दरेकर यांनी केली. त्याला उत्तर देताना अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची क्राईम ब्रँचमधून बदली करत असल्याची घोषणा केली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख