"The only brand in Maharashtra is Shivaji Maharaj, where is the Thackeray brand! | Sarkarnama

"महाराष्ट्रात एकच ब्रॅंड ते म्हणजे शिवाजीमहाराज, कुठला आलाय ठाकरे ब्रॅंड ! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

एकनाथ खडसेसाहेब आमचे नेते आहेत. त्यांचा आम्ही सन्मानच करतो असे सांगत त्यांचा कोऱ्या कागदावर राजीनामा वैगेर काही घेतला नाही असेही ते म्हणाले.

पुणे : "महाराष्ट्रात एकच ब्रॅंड आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराज! कुठला आलाय ठाकरे ब्रॅंड असं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे ब्रॅंडची खिल्ली उडविली. 

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात तात्पुरती स्थगिती मिळाल्याने राज्यात या समाजात प्रचंड असंतोष आहे. विविध संघटनांनी पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलन मोर्चे काढू नका असे आवाहन केले. तर महाधिवक्ता कुंभकोणी यांनी केलेल्या गौप्यस्फोटासह ठाकरे ब्रॅंड आदी मुद्यांवर चंद्रकांत पाटील बोलत होते. 

सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणानंतर अभिनेत्री कंगना राणावत मुंबईला पीओके म्हणणे त्यानंतर शिवसेना आणि कंगना असा रंगलेला सामना. मुंबईतील मराठी माणसाच्या मुद्यावर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मनसचे अध्यक्ष राज ठाकरे यांना घातलेली साद. ठाकरे ब्रॅंडची टिकविण्याबाबत केलेले भाष्य याकडे लक्ष वेधले असता चंद्रकांतदादांनी ठाकरे ब्रॅंडची खिल्ली उडविली.

ते म्हणाले, की महाराष्ट्रात छत्रपती शिवाजीमहाराज एकच ब्रॅंड आहे आणि तो सर्वांना मान्य आहे. हे नवीन कुठलं काढलं ठाकरे ब्रॅंड असे सांगत त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. 

खडसे यांच्याविषयी बोलताना पाटील यांनी फडणवीस यांनी जे सांगितले तेच सांगण्याचा प्रयत्न केला. एकनाथ खडसेसाहेब आमचे नेते आहेत. त्यांचा आम्ही सन्मानच करतो असे सांगत त्यांचा कोऱ्या कागदावर राजीनामा वैगेर काही घेतला नाही असेही ते म्हणाले. ते जे पुस्तक लिहिणार आहेत त्यामधील बारभाई कोण आहेत हे मला माहित नाही असेही ते म्हणाले. 

पवारांनी का नाही दिले आरक्षण ? 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री शरद पवारसाहेब गेली पन्नास वर्षे राजकारणात आहेत. त्यांनी मराठ्यांना का नाही आरक्षण दिले असा थेट सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे.महत्त्वाच्या प्रश्‍नांना पाटील यांनी उत्तरे दिली. ते "एबीपी माझा'शी बोलत होते. 

मराठा आरक्षण भाजप सरकारने दिले होते त्यासाठी कष्ट घेतले होते. या सरकारने काय केले ? किती तयारी याचे उत्तर प्रथम या मंडळीनी दिले पाहिजे. पवारसाहेब अध्यादेश काढण्याची जी भाषा करतात त्याचा काय उपयोग होणार आहे. हा अध्यादेश न्यायालयात टिकणार आहे का ? असा सवाल करून पाटील यांनी शरद पवार यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले. 

जे पवारसाहेब गेली पन्नास वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्याच पक्षांचे सरकार पंधरा वर्षे राज्यात सत्तेवर होते त्यावेळी त्यांनी मराठ्यांना का नाही आरक्षण! त्यांचे सरकार सत्तेवर असताना समाजाचा दबाव वाढू लागताच नारायण राणे समितीच्या शिफारशीनुसार घाईघाईत आरक्षण दिले त्यामध्येही अनेक त्रुटी होत्या ते टिकले असते का ? उलट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी भाजप सरकारने मेहनत घेतली. 90 दिवस यावर तयारी करीत होतो. यांनी काय केले असा सवालही त्यांनी यावेळी केला.आरोपही शेवटी त्यांनी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख