मुंबई : कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांचा भाग केंद्रशासित प्रदेश घोषित करा, आशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीरा असे वक्तव्य केले होते. कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीवरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांवर टीका केली.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुंबई कर्नाटकात समाविष्ट करण्याची स्थानिक जनतेची मागणी असल्याचा दावा केला होता. तर, कर्नाटकात समावेश होईपर्यंत मुंबई केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, अशी मागणी केली होती. या मागणीचा निषेध करत जगताप यांनी राज्यातील भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.
'भाजपाचे कर्नाटकातील उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल तीव्र शब्दात निंदा करतो. सवदी यांना समजलं पाहिजे की ज्या महाजन समितीचा हवाला ते देत आहेत, तो अहवाल काय आहे? सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला मुंबईचा नाही. तो बेळगाव आणि जवळपासच्या मराठी भाषिक भागाचा आहे. मुंबईविषयी ते इतकं बेजबाबदार बोलू शकतात. मला तर आश्चर्य वाटतंय की, भाजपाचे चमचे, भाजपाचे नेते, देवेंद्रे फडणवीस जे खूप मोठं मोठ्या गोष्टी बोलत असतात. त्यांना हे दिसत नाही का? मुंबईविषयी कर्नाटकाचा भाजपाचा उपमुख्यमंत्री बोलत आहेत आणि आपण मुंबईविषयी एक शब्द काढला नाही. गप्प बसला आहात. कंगना रणौतसारख्या दोन टक्क्यांच्या कलाकारांने मुंबईला पाकिस्तान म्हटलं होतं, तेव्हा हे देवेंद्र फडणवीस यांचे चमचे तिला झाशीची राणी म्हणत होते. आज भाजपा उपमुख्यमंत्री मुंबईविषयी बोलत आहेत आणि तुम्ही काहीच बोलत नाही आहात. महाराष्ट्र व मुंबईविषयी तुमचं हेच प्रेम आहे का?,' असा सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे.
मुंबई के बारे में लक्ष्मण सवादी जैसा कर्नाटक का भाजपा का उपमुख्यमंत्री ऐसी बेहूदा बात कैसे कर सकता है?
अब महाराष्ट्र द्रोही देवेन्द्र फडणवीस और उनके चमचे चुप क्यों है? @INCMumbai pic.twitter.com/tzGo01q2dO
— Bhai Jagtap - भाई जगताप (@BhaiJagtap1) January 29, 2021
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री काय म्हणाले होते?
“महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद भागात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की, मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. त्यामुळे जोपर्यंत मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश केला जात नाही, तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं,” असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी म्हणाले होते.

