`मला भाजपमध्ये थांबविण्यासाठी कोणाचाही फोन आला नाही` - no one called me from bjp to request not to leave party says khadse | Politics Marathi News - Sarkarnama

`मला भाजपमध्ये थांबविण्यासाठी कोणाचाही फोन आला नाही`

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

गेल्या पाच वर्षात भाजपमधील व्यक्तीकडून मला मानिसक त्रास झाला. माझ्यावर जे आरोप झाले ते अत्यंत चुकीचे आणि सूडबुद्धीतून झाले आहेत, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली. 

मुंबई : गेल्या पाच वर्षांत भाजपमधील व्यक्तींकडून मला मानिसक त्रास झाला आहे. माझ्यावर जे आरोप झाले ते अत्यंत चुकीचे आणि सूड बुद्धीतून झाले आहेत, असा आरोप राष्ट्रवादीत प्रवेश केलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशानंतर आता यापुढे संघटना विस्तार, समाजकारण, राजकारण यात काम करणार आहे. पक्ष जे सांगेल ते काम करणार आहे. माझ्याबरोबर भाजपमधील एकही आजी आमदार किंवा खासदार बरोबर नाही. येणार तर  १२ ते १५ माजी आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येतील, असे त्यांनी सागिंतले.

मला थांबवण्यासाठी भाजपकडून कोणाचाही फोन आला नाही. चंद्रकांतदादांचा फोन आला होता, पण माझी व्यथा सांगून मी पक्षात राहणार नाही ही मानसिकता बोलून दाखवली होती. कोठल्याही संघटनमंत्र्याचा फोन आला नाही. मी स्वतः चाळीस वर्षे काम करून, कार्यकर्त्यांना जोडून पक्ष मोठा केला. पण माझी पक्षाला कोणतीही गरज उरली नाही, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीवाले चॉकलेट देणार की कॅडबरी, या टीकेला उत्तर देताना त्यांची मजल चॉकलेट आणि बिस्कीट इथपर्यंत आहे. ते काय बोलू शकणार? ते पक्षात नवीन आहेत. त्यांचे म्हणणे गांभीर्याने घ्यायची गरज नाही. त्यांनी पक्षासाठी काय आंदोलने केलीत, किती खस्ता खाल्ल्यात, त्यांचे पक्षासाठी योगदान काय, असा सवाल त्यांनी विचारला.

सिंचन घोटाळ्यातील साक्षीदार राष्ट्रवादी काॅंग्रेसने पळवला, अशी टीका खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर राम शिंदे यांनी केली होती. त्या टिकेबद्दल विचारले असता खडसे म्हणाले की सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे आहेत, असे सांगून भाजपचे बैलगाडीत कागदपत्रे घेऊन औरंगाबादला गेले होते. मात्र मी त्यात सहभागी नव्हतो. राम शिंदे यांना यातील काही माहीत नाही. राम शिंदे नवीन माणूस आहे. त्यांचे बोलणे मी फार गांभीर्याने घेत नाही.

तुमच्या प्रवेशवार राष्ट्रवादीमधील अनेक नेते नाराज असल्याची चर्चेबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की या बातम्या मी पण वाचल्या. पवार साहेबांनीही त्या ऐकल्या. या चर्चा  केवळ अफवा आहेत. माझे स्वागत स्वतः अजित पवार यांनी केले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची नाराजी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख