Nitesh Rane's letter to Mumbai Commissioner on the death of Corona patient | Sarkarnama

नितेश राणे यांच्याकडून शिवसेना पुन्हा लक्ष्य 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 20 जून 2020

मुंबईच्या महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून महापालिकेने प्रभागनिहाय मृतांची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या माहितीमध्ये गोंधळ असल्यामुळे नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. म्हणून ही माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. 

मुंबई : ठाकरे आणि राणे यांच्यातील सख्खे अख्या महाराष्ट्राला परिचित आहे. त्यातच राणे कुटुंबीय ठाकरे कुटुंबावर कायम तुटून पडत असते. आताही कोरोना महामारी, कोरोनाचे रुग्ण रुग्णालयातून पळून जाणे व इतर गोष्टींवरून राणे कुटुंबीय विशेषः आमदार नितेश राणे हे कायम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. 

भाजपचे आमदार असलसेले नितेश राणे यांनी शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेला लक्ष्य केले आहे. मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीवरून आमदार राणे कायम शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दीक हल्ला करीत असतात.

त्यांनी आता मुंबईच्या महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून महापालिकेने प्रभागनिहाय मृतांची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या माहितीमध्ये गोंधळ असल्यामुळे नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. म्हणून ही माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. 

जगात सहा महिन्यांपासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. मुंबईतही रुग्ण वाढत चालले आहेत. अनेक रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत; मात्र त्यांची संख्या चुकीची सांगितली जात आहे, त्यामुळे नागरिक संभ्रमात आहेत, असे आमदार नितेश राणे यांनी महापालिका आयुक्त इक्‍बालसिंग चहल यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

मुंबईतील कोरोनाविषयक माहिती नागरिकांना मिळणे आवश्‍यक आहे. त्यामुळे महापालिकेने मृत रुग्णांची माहिती प्रभागनिहाय उपलब्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच कोरोना रुग्णांच्या मृत्यूबाबत मोठा गोंधळ झाला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करण्याची मागणी केल्यानंतर सरकारने 1328 मृत्यूंची नोंद केली होती. त्यामध्ये मुंबईतील 862 मृत्यूंचा समावेश होता. 

मुंबईत 3423 कोरोना रुग्ण दगावले 

मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे 1269 नवीन रुग्ण आढळले होते, त्यामुळे बाधितांची संख्या 64 हजार 68 वर गेली आहे. शहरात 114 रुग्णांचा मृत्यू झाला असून शुक्रवारपर्यंत 3 हजार 423 जण कोरोनामुळे दगावले आहेत. त्यापैकी 59 रुग्णांचा मृत्यू 15 जूनपूर्वी झाल्याचे सांगण्यात आले. 

मुंबईत 78 पुरुष आणि 36 महिला अशा 114 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 67 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. दगावलेल्या रुग्णांपैकी नऊ जण 40 वर्षांखालील, 50 जण 40 ते 60 वर्षे वयोगटातील आणि 55 जण 60 वर्षांवरील होते. 

शुक्रवारी एकूण 791 नवे संशयित रुग्ण सापडले, त्यामुळे आतापर्यंत रुग्णालयांत दाखल झालेल्या संशयित रुग्णांची संख्या 45 हजार 339 वर पोचली आहे. कोरोनावर मात केलेल्या 401 रुग्णांना शुक्रवारी घरी पाठवण्यात आले. आतापर्यंत 32 हजार 257 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख