अधिवेशन येताच मंत्र्यांना कोरोना....नितेश राणे WHO ला पत्र लिहिणार - Nitesh Rane criticizes the government over the coronation of minister | Politics Marathi News - Sarkarnama

अधिवेशन येताच मंत्र्यांना कोरोना....नितेश राणे WHO ला पत्र लिहिणार

अनंत पाताडे 
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

मंत्र्यांना झालेला कोरोना राजकीय आहे का,  असा सवाल आमदार नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.   

सिंधुदुर्ग : "येत्या एक मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. गेल्या आठ दिवसांत मंत्र्यांना कोरोना होण्याच्या बातम्या बाहेर येत आहेत. महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मंत्र्यांना आठ दिवसांत झालेला हा कोरोना 'कोविड 19'चा आहे की राजकीय कोरोना आहे," असा सवाल भाजपचे नेते आमदार नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.   

नितेश राणे म्हणाले, ''विधिमंडळ अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या प्रश्नांना राज्य सरकारकडे द्यायला उत्तर नाही, म्हणून कोरोनाचा आसरा हे राज्य सरकार घेत नाही ना असा प्रश्न माझ्या मनात आहे. आमचे आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब गेल्या दीड वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरले त्यांना कधी आतापर्यंत कोरोना झाला नव्हता, तो बरोबर अधिवेशनाच्या आधी आठ दिवस झाला. छगन भुजबळ साहेबांना ही नेमका
आज सकाळी कोरोना झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब हे कुटुंब संवाद यात्रेसाठी राज्यभर फिरत आहेत, त्यांना आतापर्यंत कोरोना झाला नव्हता तो बरोबर आठ दिवसांपूर्वी झाला. यामुळे हा एक
वेगळ्या प्रकारचा कोरोना महाराष्ट्रात आला नाही ना असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे. डब्लूएचओला (WHO) पत्र लिहून या कोरोनाबाबत संशोधन करण्यासाठी मी सांगणार आहे.''

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही दुसऱ्यांदा
कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुंबईतील घरातील दोघांना कोरोना झाल्याने ते विलगीकरणात आहेत. काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांना आज कोरोनाची लागण झाली आहे.

नवीन 'सामना' मार्केटमध्ये येतोय..
"आता वेगळ्या प्रकारचा 'सामना' आम्हाला वाचायला मिळतो. बाळासाहेबांच्या काळात हिंदुत्वाचा गवगवा करणारा 'सामना' आम्ही वाचलाय. आता हा उद्धव ठाकरेंचा नवीन 'सामना' मार्केटमध्ये येतोय. इथे हिंदुना विरोध केला जातो, हिंदुच्या सणांना विरोध केला जातोय म्हणून असा 'सामना' वाचायचा आम्ही कधीच सोडून दिला आहे. हिंदुविरोधी 'सामना' वाचायचा आम्ही बंद केला आहे, '' असे राणे यांनी नमूद केले.

नवीन स्ट्रेन..विधिमंडळ अधिवेशन कोरोना...मनसेचा टोला 
मुंबई : मंत्र्यांनाच कोरोनाची लागण होत असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.  मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टि्वट केले आहे. ते म्हणतात, "सावधान सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे, त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो."

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख