मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी दुपारी दिल्ली सीमेवर जाऊन शेतकरी आंदोलकांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपचे नेते निलेश राणे यांनी राऊतांवर ढोंगी म्हणत निशाणा साधला आहे. दिल्तीत आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेले पण कधी मराठा आंदोलकांना भेटले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या अन्य खासदारांनी दिल्ली-उत्तरप्रदेश सीमेवर शेतकरी आंदोलकांची भेट घेतली. या भेटीनंतर राऊत यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासोबतचे छायाचित्र ट्विट करून 'म्हारो टिकैत' असे म्हटले आहे.
संज्या राऊत जितका झटपट दिल्ली येथील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेला तसाच कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंदोलनाला संज्या कधी गेला नाही, महाराष्ट्रातले आंदोलनकारी नको फक्त महाराष्ट्र हे नाव पाहिजे राजकारण करायला... एक नंबर ढोंगी
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 2, 2021
निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्या या भेटीवरून ट्विट करत निशाणा साधला आहे. ''जितके झटपट दिल्ली येथील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेले तसेच कधी मराठा आंदोलकांना भेटल नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंदोलनाला कधी गेले नाहीत. महाराष्ट्रातले आंदोलनकारी नको फक्त महाराष्ट्र हे नाव पाहिजे राजकारण करायला... एक नंबर ढोंगी", असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, टिकैत यांना भेटल्यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, 'टिकैत यांना भेटल्यानंतर आमचा पाठिंबा असल्याचे सांगितले. सरकारने शेतकऱ्यांशी योग्य मार्गाने चर्चा करायला हवी. देश चालविण्यासाठी अहंकार उपयोगी पडत नाही,' अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली.
टिकैत यांनी ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, विविध पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ते याठिकाणी भेटायला येत असतात. आम्ही यामध्ये राजकारण करत नाही. ते त्यांची भूमिका मांडतात.
टिकैत यांच्या भेटीपूर्वी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ''भारत-चीन सीमेवर सळ्या लावल्या असत्या तर चीन भारतात घुसला नसता. शेतकरी त्यांच्यासह आपल्यासाठीही आंदोलन करत असल्याने त्यांना पाठिंबा द्यायला हवा. आमचे हे कर्तव्य मानतो,'' असे ते म्हणाले.
Edited By Rajanand More

