जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार - Nilesh Rane criticizes Shiv Sena and Vinayak Raut | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपला वैभववाडीत शिवसेनेने जोरदार धक्का दिला. भाजपचे वैभवाडीतील ७ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपला वैभववाडीत शिवसेनेने जोरदार धक्का दिला. भाजपचे वैभवाडीतील ७ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शहांच्या दौऱ्यानंतर भाजप नगरसेवक फुटल्याने या घटनेची राज्यभरात चर्चा होत आहे. भाजप खासदार नारायण राणे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे काम शिवसेनेकडून केले जात आहे, त्यामुळे माजी खासदार नीलेश राणेंनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 

नीलेश राणेंनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की, जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे नगरसेवक फोडणार असल्याचा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला. तर, व्हिडीओ पोस्ट करत शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला. 

वैभववाडी नगरपंचायतीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सध्या नगरपंचायतीचे 17 पैकी 17 नगरसेवक भाजपचे आहेत. नगरपंचायतीची निवडणूक लवकरच होणार आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने भाजपला जोरदार दणका दिल्याने राज्यभर ही चर्चा रंगली, त्यामुळे माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेवर व विनायक राऊत यांच्यावर प्रहार केला. 

नीलेश राणे विनायक राऊतांना म्हणाले की, सामाजिक कामासाठी राऊत कधी बोलणार नाहीत, त्यांनी खासदार नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. भाजपच्या लाटेवर दोन वेळा ते निवडून आले. हिंमत असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि निवडणूक लढवा, कोणत्याही विषयावर यांना बोलता येत नाही. राऊत तुमची वेळ जवळ आली आहे. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत तुम्हाला पाडणार आहे, असा इशारा नीलेश राणे यांनी दिली.    

काय म्हणाले होते नीतेश राणे...

वैभववाडीचे काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची बातमी वाचली आहे, व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर आहे आणि शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे, जुन्या प्रेमाला कधी विसरायचं नसतं असं सगळेच म्हणतात. वैभववाडीची सध्या परिस्थिती पाहिली तर शिवसेनेकडे मूळ शिवसैनिक सापडणार नाही.

येणाऱ्या निवडणुकीत कोणी उमेदवार भेटणार नाहीत. शिवसेना पक्ष हा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरेंवर आमचं नितांत प्रेम आहे, त्यामुळे शिवसेना पक्षाची अशी अवस्था होऊ नेय, अशी माझ्यासारख्या बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या कुटुंबाची भावना आहे. म्हणून हे ७ नगरसेवक व्हॅलेंटाईन डे निमित्त उद्धव ठाकरेंकडे पाठवतोय'' असा उपरोधीक टोला नीतेश राणेंनी लागावला आहे. 

''मेडिल कॉलेजच्या कामासाठी नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन लावला होता, तेव्हा उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद देत मेडिकल कॉलेजच्या फाईलवर सही केली, आम्ही उद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही. दिलं तरी ते घेणार नाही, गुच्छ दिला तरी ते स्वीकारणार नाहीत. त्यामुळे हे ७ नगरसेवक त्यांना आभार आणि धन्यवाद मानण्यासाठी पाठवत आहे, त्याचा स्वीकार त्यांनी करावा'' असं सांगत नीतेश राणेंनी व्हॅलेंटाईन डे निमित्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत शिवसेनेला चिमटा काढला होता. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख