घरात नाही दाणा पण मला 'वॅक्सिन गुरू' म्हणा...रुपाली चाकणकरांचा मोदींवर निशाणा

या पापाचे प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल.
 Narendra Modi, Rupali Chakankar .jpg
Narendra Modi, Rupali Chakankar .jpg

मुंबई : लस उपलब्ध नसल्यामुळे देशात अनेक ठिकाणी लसीकरण (Vaccination) बंद पडले आहे. केंद्र सरकारने इतर देशांना मोठ्या प्रमाणात लस दिल्यामुळे देशातील नागरिकांचे लसीकरण थांबले आहे. त्यावरुन केंद्र सरकारवर (central government) विरोधी पक्षांनी टीका सुरु केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ( NCP's women state president Rupali Chakankar's criticism of the central government)

त्यांनी या संदर्भात एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, ''घरात नाही दाणा पण मला "वॅक्सिन गुरू" म्हणा...भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचे फळ जनतेला भोगावे लागत आहे. या पापाचे प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल'', अशी टीका चाकणकर यांनी केली आहे. 

पुणे महापालिकेकडचे कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसीचे डोस संपले असून, शासनाकडून नव्याने लस पुरवठा करण्यात आलेला नाही. परिणामी आज शहरातील सर्व लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेला शासनाकडून मिळालेले कोव्हीशील्ड लसीचे २८ हजार डोस शुक्रवारीच संपले. ३ हजार कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध असल्याने त्याचे शनिवारी आणि रविवारी नियोजन केले होते. ही लस काल संपली. रविवारी शासनाकडून लस पुरवठा झालेला नसल्याने पालिकेने सोमवारी सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर त्याचे नियोजन जाहीर केले जाईल, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, देशातील कोरोना (Covid19) रुग्णसंख्येतील (Patients) वाढ सुरूच असली तरी या वाढीचा वेग आता कमी होऊ लागला आहे. देशात 21 एप्रिलनंतर प्रथमच नवीन रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख  81  हजार 386 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 106 जणांचा मृत्यू (Covid Deaths) झाला आहे.  

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 49 लाख 65 हजार 463 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 74 हजार 390 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 27 दिवसांनंतर प्रथमच रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून, आता ती 35 लाखांवर आली आहे. सक्रिय रुग्णांची जास्त असल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 35 लाख 16 हजार 997 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 14.09 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 84.81 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 11 लाख 74 हजार 76 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.10 टक्के आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com