मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह तीन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धास्तावले आहेत. त्यामुळे पक्षाने पुढील दोन आठवडे जनता दरबार हा उपक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पक्षाने केले आहे.
राज्यात कोरोना संसर्ग वाढत चालल्याने राज्य शासनाची चिंताही वाढू लागली आहे. त्यातच सध्या चार मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुंबईतील घरातील दोघांना कोरोना झाल्याने ते विलगीकरणात आहेत. काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुढील दोन आठवडे जनता दरबार हा उपक्रम स्थगित करण्यात येत आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. #जनतादरबार #NCP pic.twitter.com/LfA6SpbCjh
— NCP (@NCPspeaks) February 19, 2021
राज्य सरकारमधील मंत्र्यांनाच कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने सर्वच राजकीय पक्षांची चिंता वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेश कार्यालयात होणार जनता दरबार हा उपक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे जनता दरबार होणार नाही, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जनता दरबारमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री थेट जनता तसेच कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात.
हेही वाचा : माझ्यावर दया करा, फाशी देऊ नका; शबनमची दया याचिका
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही आवाहन केले आहे. सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन आणि गर्दी टाळावी, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.
जनतेची व कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून समस्या अथवा प्रश्न असल्यास ते संबंधित मंत्र्यांच्या नावाने जनता दरबारच्या मेल आयडीवर मेल करावेत, असेही पक्षाने स्पष्ट केले आहे.
Edited By Rajanand More

