पवार- शहा भेटींच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही : प्रफुल्ल पटेल - ncp leader praful patel says thackeray pawar govt is in no danger | Politics Marathi News - Sarkarnama

पवार- शहा भेटींच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही : प्रफुल्ल पटेल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 मार्च 2021

शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये अमित शहा यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. काल शहा यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही भेट झाल्याचे नाकारले नाही. पत्रकारांनी त्यांना या भेटीबाबत विचारले असता त्यांनी "प्रत्येक भेटीतील चर्चा सार्वजनिक करता येत नाही," असे म्हणत अधिक बोलायचे टाळले. पण शहा यांनी थेट शब्दांत ही भेट झाली नसल्याचेही अमान्य केले नाही. 

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज याबाबत खुलासा केला आहे. पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी केरळमध्ये प्रचारासाठी गेले आहेत. त्यावेळी ते तिरूअअनंतपूरममध्ये पत्रकारांशी बोलत होते. पटेल म्हणाले, "महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारचे निर्माते शरद पवार आहेत. त्यामुळे असल्या भेटींच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. ठाकरे – पवार सरकार स्थिर आहे. त्याला कोणताही धोका नाही."  

राणे म्हणतात, "पवारसाहेब शहांना भेटले तर त्यात नवल वाटायचं कारण नाही.."

'शरद पवार, प्रफुल पटेल यांची अमित शहा यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नाही. ही अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला आहे,' अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काल दिली आहे.

गेले दोन दिवस टि्वटवर बातम्या पसरवण्यात आल्या आणि एका वर्तमान पत्रामध्ये लहान बातमी प्रसारीत करुन वृत्त वाहिन्यांवर बातम्या दाखवायला सुरुवात करण्यात आली. एका पत्रकाराकडून प्रश्न विचारुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतः अमित शहा यांनी केला आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. 

गुजरात मधील केवडीया येथील एका नियोजित कार्यक्रमासाठी शरद पवार अहमदाबादला गेल्याचे समजते. मात्र हा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर ते लगेच परत मुंबईत परतले. या काळात त्यांची व अमित शहा यांची बिल्कुल भेट झाली नाही. असे खात्रिलायक सुत्रांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधे हेतुपुर्वक गैरसमज पसरवण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे या सुत्रांनी सांगितले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख