फडणवीस, दरेकर, लाड, अळवणी हे रात्री पोलीस ठाण्यात का गेले?

काल रात्री ब्रुक फार्मा या औषध कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
Ncp Leader Nawab Malik criticise devendra fadanvis and pravin darekar
Ncp Leader Nawab Malik criticise devendra fadanvis and pravin darekar

मुंबई : ब्रुक फार्मा या औषध कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड व पराग अळवणी हे लगेच पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यावरून आता सत्ताधारी पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरूवात केली आहे. दोन्ही विरोधी पक्षनेते, दोन आमदार थेट पोलिस ठाण्यात का गेले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नसून केंद्र सरकार त्यास नकार देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री  नवाब मलिक यांनी काल दिली. त्यावर भाजपने मलिक यांच्यासह ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. हे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच काल रात्री ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकनिया यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. 

डोकनिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळताच फडणवीस, दरेकर, लाड व अळवणी यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर काही वेळात डोकनिया यांना सोडून देण्यात आले. यावरूनही पुन्हा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. '' पोलिस रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी काम करत आहेत. राजेश डोकाणीया यांच्याकडून पोलिसांनी साठ्याबाबत माहिती घेऊन सोडून दिले. मात्र फडणवीस, लाड, दरेकर, अळवणी हे रात्री पोलीस ठाण्यात गेले. यात काही गडबड आहे. एखादा नेता फोनवर माहिती घेऊ शकतो. मात्र फडणवीस स्वतः गेले,'' असा आरोप मलिक यांनी केला आहे. 

साठा सरकायला देऊ नका अशी भूमिका हे नेते घेत आहेत. डोकानियला सोडवण्यासाठी फडणवीस का गेले?  भाजप का घाबरते? भाजपचे प्रमुख नेते पोलीस ठाण्यात का गेले हे स्पष्टीकरण द्यावे. इंजेक्शनचा साठा या लोकांकडे आहे. 50 हजार वाटणार, असं ट्विट करतात, मात्र सरकारला का देत नाही, असे अनेक प्रश्न मलिक यांनी उपस्थित केले.

काय म्हणाले होते नवाब मलिक?

कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमडेसिवीरचा पुरवठा महाराष्ट्राला करू नका. अन्यथा परवाना रद्द करू असा दबाव केंद्र सरकारने औषध कंपन्यांवर टाकला असून राज्य सरकारने रेमडेसिवीर औषध निर्माण कंपन्यांकडे विचारणा केली असता ही माहिती समोर आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. रेमडेसिवीरचे उत्पादन करणार्‍या सात कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र या सात कंपन्या ही जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्र सरकारपुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

कोरोनाचा वाढता प्रार्दुर्भाव लक्षात घेता रेमडेसिवीरची कमतरता भासू लागली असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडे या १६ निर्यातदारांकडून रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com