भाजप नेत्यांसाठी नवीन कायदा आलाय का? जयंत पाटलांनी फडणवीस, दरेकरांना सुनावलं - NCP Leader Jayant Patil slams Bjp Leaders over remdesivir issue | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

भाजप नेत्यांसाठी नवीन कायदा आलाय का? जयंत पाटलांनी फडणवीस, दरेकरांना सुनावलं

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 18 एप्रिल 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांच्या या कृतीवर जोरदार टीका केली आहे

मुंबई : रेमडेसिविर उत्पादक कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी चौकशीला बोलवल्यावरून राज्यात राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड व पराग अळवणी यांनी रात्रीच पोलिस ठाणे गाठत सरकारवर टीका केली. तर सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनीही त्यांच्या पलटवार केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांच्या या कृतीवर जोरदार टीका केली आहे. यंत्रणेला किंवा राज्यसरकारला माहिती न देता रेमडेसिविर औषध कसं खरेदी करतात? नविन कायदा आलाय का?, असे म्हणत पाटील यांनी भाजप नेत्यांना सुनावलं. एका साठेबाजाची बाजू घेण्यासाठी राज्यातील दोन विरोधी पक्षनेते रात्रीच्या वेळी पोलिस स्टेशनमध्ये का जातात, असा सवाल उपस्थित करत पाटील यांनी फडणवीस व दरेकर यांच्यावर निशाणा साधला.

पाटील यांनी मुंबई पोलिसांचेही कौतुक केले आहे. साठेबाजाला चौकशीला बोलावून दोन तास चौकशी करत पोलिसांनी त्यांचे काम चोखपणे पार पाडले आहे, असे ते म्हणाले. रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर पोलीस स्टेशन गाठत हस्तक्षेप केला होता.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीकास्त्र सोडले आहे.  पटोले म्हणाले , ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मुंबईत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली व ब्रुक फार्मा कंपनीच्या एका अधिका-याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करून ते रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ जनतेला उपलब्ध करून दिले पाहिजेत.

आज राज्यात रेमेडीसीवर, ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुडवडा असून केंद्र सरकार राज्याबरोबर आणि राज्यातील जनतेबरोबर जे घाणेरडे राजकारण करत आहे ते निषेधार्ह आहे. रेमडेसीवरच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमिवर काही कोटींचा रेमडेसीवरचा साठा कुठून आला ? याचा काळा बाजार करणारे ते कोण आहेत? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत.

फडणवीस यांनी दाखवलेले ते पत्र सार्वजनिक केले पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भानगडीत जनता भरडली जाणार नाही याची खबरदारी घेऊन या संकटात आपण जनतेला सर्व प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, असेही पटोले यांनी या पत्रात नमूद केले आहे. कोरोनाच्या या महामारीत जनतेचे जीव वाचवण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करावेत, असेही पटोले म्हटले आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख