मुंबई : "धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात पक्षात चर्चा करावीशी वाटते, हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे म्हणजे हा पक्ष किती हा ढोंगी व अनैतिक आहे, हेच दाखवून देते,'' अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
मुंडे यांच्यावर मुंबई एका महिलेने बलात्काराचे व लैंगिक छळाचे आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनीही यासंदर्भात सावध भूमिका घेतली आहे. मुंडे यांच्यावरील आरोपांची शहनिशा केल्याशिवाय निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. आम्ही यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. या भूमिकेवर भातखळकर यांनी कडाडून टीका केली आहे.
अशा प्रकरणात खरे म्हणजे चर्चा करण्याचा काहीही संबंधच येत नाही. अशा प्रसंगी संबंधिताचा तत्काळ राजीनामा घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवायला हवा. त्याऐवजी चर्चा करू, असे म्हणणे योग्य नाही. या संदर्भातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची विधाने म्हणजे बेशरमपणाचा कळस तर आहेच, पण त्यांच्या नैतिकतेचा बुरखा पूर्णपणे फाडणारी आहेत, असा दावाही त्यांनी केला.
एका महिलेने पुराव्यांसहित बलात्काराचे गंभीर आरोप केले तरीही यासंदर्भात पोलिसांनी एफआयआर नोंदविला नाही. त्यामुळे यात चर्चा करण्याचा काय मुद्दा आहे. अशा प्रकरणात संबंधितांचा तत्काळ राजीनामा घेऊन एफआयआर नोंदवून चौकशी करण्याची गरज आहे. त्याऐवजी पक्षात चर्चा करावीशी वाटते, हे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस हा किती ढोंगी व अनैतिक पक्ष आहे, हेच दाखवून देते, असे भातखळकर म्हणाले.

