अॅाक्सीजन प्रकल्प : राष्ट्रवादीने काढली भाजपच्या आरोपांतील हवा

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून निधी देण्यात आला होता, असा आरोप भाजपने केला होता.
NCP attacks bjp leaders over oxygen plant issue in maharashtra
NCP attacks bjp leaders over oxygen plant issue in maharashtra

मुंबई : महाराष्ट्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून  निधी देण्यात आला होता. मात्र आघाडी सरकारने या निधीचा विनियोगच केला नाही, असा आरोप भाजपने रविवारी केला होता. हे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने खोडून काढले आहेत. अॅाक्सीजन प्रकल्पांसाठी राज्याला निधी आलाच नाही, असे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

केंद्राने दिलेला निधी आणि मुख्यमंत्री निधीतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे केले असते तर राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांचा बळी गेला नसता. केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीचे काय केले याचा आघाडी सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी केली होती.

आज राष्ट्रवादीकडून फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात ऑक्सिजन तुटवड्यामुळे अनेक रुग्णांची घुसमट होऊन त्यांना आपले प्राण गमवावे लागले. याचं खापर केंद्र सरकार आणि भाजपवर पडायला लागल्यानंतर महाराष्ट्रद्रोही भाजपने उलट कांगावा सुरू केला. केंद्र सरकारकडून राज्यात १० ऑक्सिजन प्रकल्प बसविण्यासाठी निधी देण्यात आला होता, तो निधी राज्याने हडप केल्याची बिनबुडाची कांगावखोर टीका भाजपच्या महाराष्ट्रद्रोही नेत्यांनी सुरू केली. वस्तुस्थिती वेगळीच आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर देशभरात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी ५ जानेवारीला पीएम केअर फंडातून २०१.५८ कोटींच्या निधीची घोषणा झाली. १६२ ऑक्सिजन प्रकल्पांपैकी १० महाराष्ट्रात होणार असं सांगितलं गेलं. प्रत्यक्षात महाराष्ट्राकडे निधी आलाच नाही. तो केंद्र सरकारच्याच 'सेंट्रल मेडिकल सप्लाय स्टोर्स' या संस्थेकडे गेला. हे प्रकल्प बसविण्यासाठी राज्याला कोणताही निधी दिलेला नाही. उलट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ट्विटरवर १८ एप्रिलला या १६२ पैकी केवळ ३३ प्रकल्प कार्यरत झाल्याचं सांगण्यात आलं आणि त्यात महाराष्ट्रातला एकच प्रकल्प होता, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

जानेवारी २०२१ मध्ये तरतूद होऊनही राज्यात प्रकल्पांची यंत्रणा यायला ५ एप्रिल रोजी सुरुवात झाली. प्रकल्पासाठी लागणारे यंत्र, साहित्य महाराष्ट्रात आले. त्यानंतर त्याच्या इन्स्टॉलेशनसाठी ७ ते ८ दिवसांचा कालावधी गेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ एप्रिल रोजी प्रकल्प येईल आणि त्यानंतर ८ दिवसांत तो चालू होण्याची शक्यता आहे, असे सांगितले जाते. कोर्ट एकीकडे सांगतंय की, ऑक्सिजनसाठी भीक मागा, उधारी घ्या, डाका टाका. पण आपण गेले चार महिने फक्त प्राणवायूअभावी गुदमरून मरण्याची वाट बघत होतो. वर यांचं निर्लज्ज राजकारण सुरूच आहे, अशी टीकाही राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com