नौदलाची सुसज्ज पथके कोकणात उतरली; राज्यात अन्यत्र जाण्यासही सज्ज - Naval squads dispatched to Konkan for flood victims | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

नौदलाची सुसज्ज पथके कोकणात उतरली; राज्यात अन्यत्र जाण्यासही सज्ज

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 23 जुलै 2021

राज्य सरकारच्या विनंतीनुसार नौदलाच्या पश्चिम विभागाने बचाव पथके तसेच हेलिकॉप्टर पूरग्रस्त भागात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : नौदलाच्या (Navy) नौसैनिकांची सुसज्ज पथके व निष्णात डायव्हर कोकणात (Konkan) पोहोचले असून पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी मोठी हेलिकॉप्टरही रवाना झाली आहेत. गरज भासल्यास राज्यात अन्यत्र पूरग्रस्त ठिकाणी जाण्यासाठीही नौदलाची पथके तयार ठेवण्यात आल्याची माहिती नौदल प्रवक्त्याने दिली आहे. (Naval squads dispatched to Konkan for flood victims) 

राज्य सरकारच्या विनंतीनुसार नौदलाच्या पश्चिम विभागाने बचाव पथके तसेच हेलिकॉप्टर पूरग्रस्त भागात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. काल रात्री मुंबईहून निघालेली ही पथके आज सकाळी महाड पर्यंत गेली आहेत. पूर पावसाच्या परिस्थितीनुसार तेथून ते पुढे जाणार आहेत. 

हेही वाचा : रुग्णवाहिका वाहून गेली...ऑक्सिजन पुरवठा थांबला अन् 21 जणांचा जीव टांगणीला लागला 

खराब हवामानाची पर्वा न करता नौदलाची सात पथके रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी काल रात्री मुंबईहून ट्रकमधून निघाली. तर मुंबईतील नौदलाच्या आएनएस शिक्रा या हवाईतळावरून सीकिंग हेलिकॉप्टर रायगड जिल्ह्यात जाऊन तेथील पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेईल. 

या पथकांकडे रबरी बोटी, प्रथमोपचार संच, लाईफ जॅकेट व अन्य जीवरक्षक साधने आहेत. यातील निष्णात डायव्हर्सकडे खोल पाण्यात बुडी मारण्यासाठी लागणारी उपकरणेही आहेत. तर गरज भासल्यास राज्यातील अन्य पूरग्रस्त भागात जाण्यासाठीही नौसैनिकांची पथके सज्ज आहेत, अशी माहिती नौदल प्रवक्त्याने दिली आहे. 

दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती तीव्र आणि गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने कालपासूनच सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, काळजी म्हणून नेहमी संकटात असणाऱ्या गावांनी आपली जनावरे, महत्त्वाच्या वस्तू घेऊन स्थलांतरीत व्हावे असे, आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जनतेला केले आहे. 

हेही वाचा : साताऱ्यात पश्चिमेकडे संततधार; कोयनेतून उद्या पाणी सोडणार, पुल खचल्याने आंबेनळी घाट बंद

आपल्या सर्वांची मोठी आबाळ होईल पण निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही, अशी भावनिक साद पाटील यांनी नागरिकांना घातली आहे. सांगलीतही परिस्थिती गंभीर होत चालली आहे. लोकप्रतिनिधी, सरपंच, यंत्रणेने ताबडतोब हालचाली कराव्यात. शिवाय तेथील प्रशासनालाही सूचना दिल्या आहेत. जलसंपदा विभाग धरणांच्या पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवून आहे. तसेच कर्नाटक सरकारशी संपर्कात आहोत. शिवाय प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सातत्याने संपर्कात असल्याचा धीरही मंत्री जयंत पाटील यांनी जनतेला दिला आहे. 

एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. मात्र पाऊस खुप आहे. त्यामुळे काठावरच्या गावांनी परिस्थिती बिघडण्याच्या आत बाहेर पडावे. पश्चिम महाराष्ट्राने अशी अनेक संकट पाहिली आहेत. आपण या संकटालाही तोंड देऊ असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील २०१९ चा पूर आठवला की अनेकांना झोप लागत नाही. मागच्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रात त्याच तीव्रतेचा पाऊस पडत आहे, आणि पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. मागचा अनुभव लक्षात घेता नागरिकांचे अधिक नुकसान होऊ नये. यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत, असेही पाटील यांनी सांगितले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख