नारायण राणेंनी मानले आभार....

त्यांनी काल रात्री जामीन मिळाल्यानंतरही ‘सत्यमेव जयते’ ह्या दोन शब्दांचे ट्विट केले होते.
 Narayan Rane thanked BJP workers, office bearers and colleagues
 Narayan Rane thanked BJP workers, office bearers and colleagues

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाडच्या न्यायालयाने मंगळवारी रात्री उशिरा जामीन दिला. त्यानंतर त्यांनी ‘सत्यमेव जयते’ असे ट्विट केले होते. त्यानंतर आज पुन्हा राणे यांनी ट्विट करत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. (Narayan Rane thanked BJP workers, office bearers and colleagues)   

केंद्रीय मंत्री राणे यांनी आपल्या ‘ट्विट’मध्ये म्हटले आहे की, कालच्या प्रसंगामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझ्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद!. तत्पूर्वी त्यांनी काल रात्री जामीन मिळाल्यानंतरही ‘सत्यमेव जयते’ ह्या दोन शब्दांचे ट्विट केले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राणे यांच्या विरोधात नाशिक, पुणे आणि महाड या तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. पण जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने कोकणच्या दौऱ्यावर असलेल्या राणे यांना संगमेश्वर पोलिसांनी गोळवली येथे काल अटक केली होती. त्यानंतर काल दिवसभर राज्यात ठिकठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.

दरम्यान, नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार नीतेश राणे यांनीही ट्विट करत शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ट्विटमध्ये राणे यांनी म्हटले आहे की, शिवसेनेने काल केलेली आंदोलने पश्चिम बंगालप्रमाणेच सरकारपुरस्कृत होती. राणेंनी एक फोटो शेअर केला आहे. जुहू इथं आंदोलन करणारे युवा सेनेचे कार्यकर्ते या फोटोमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत दिसत आहेत. नीतेश राणे म्हणतात, 'खुद्द मुख्यमंत्री गुंडांचा सत्कार करताहेत. ही महाराष्ट्राची सध्याची स्थिती आहे. राष्ट्रपती राजवट हाच यावर उपाय आहे.' 

नीतेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयी याचाही एक व्हिडिओ टि्वट केला आहे. ‘सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जशास तसं उत्तर मिळेल,’ असा इशारा नीतेश यांनी या माध्यमातून शिवसेनेला दिला आहे. 

‘काल संपूर्ण ठाकरे सरकार आणि शिवसेना कामाला लागली, महाराष्ट्रासाठी नाही राणेंसाठी. काल आमचे जे सहकारी व कार्यकर्ते शिवसेनेला भिडले त्यांचे मनापासून आभार. शिवसेनेचे मुख्यमंत्री, मंत्री, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी टोकाचे प्रयत्न करूनसुद्धा आमचं काही उखाडू शकले नाही. औकात कळली? असे टि्वट नीलेश राणे यांनी केलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com