नारायण राणेंना अमित शहांकडून तर निलेशना फडणवीसांकडून गिफ्ट! - narayan rane gets gift from Amit Shaha and nites from Fadanavis | Politics Marathi News - Sarkarnama

नारायण राणेंना अमित शहांकडून तर निलेशना फडणवीसांकडून गिफ्ट!

तुषार रुपनवर
बुधवार, 20 जानेवारी 2021

भाजपमध्ये सध्या राणे पितापुत्रांची चलती... 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील खिंड जोमाने लढणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे यांचे भाजपमध्ये वजन सध्या वाढले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कोकणात चांगली कामगिरी केल्याचे `गिफ्ट` प्रदेश भाजपने माजी खासदार निलेश राणे यांना दिले. योगायोगाने याच वेळी त्यांचे वडील नारायण राणे यांनाही त्यांचा जुना सन्मान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या खात्याकडून पुन्हा मिळाला.

भाजपने राज्यात सुमारे सहा हजार ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला होता. त्यात कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायती राणे यांच्यामुळे भाजपकडे आल्या. निलेश राणे यांनी ग्रामपंचायत निकालाच्या दिवशी जोरदार बॅटिंग करत शिवसेनेला कोकणात झोपविल्याचा दावा केला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी निलेश यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती केल्याचे जाहीर करण्यात आले. निलेश हे ट्विटरवर महावविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात थेटपणे टीका करत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, विनायक राऊत हे त्यांचे विशेष लक्ष्य असतात. खालच्या पातळीवरील टीका ते अनेकदा करत असतात.  

मुंबईत बुधवारी आयोजित कोकण विभागाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे नेते उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वी भाजपाचे अस्तित्व नगण्य होते. कार्यकर्त्यांची मजबूत फळीही उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत भाजपने रत्नागिरी जिल्ह्यात नेत्रदीपक यश मिळविले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ३०१ जागा निवडून आल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपाने मिळविलेल्या यशाची दखल म्हणून नियुक्ती झाल्याचे सांगण्यात आले.

 

 

नारायण राणे यांची संपूर्ण सुरक्षाव्यवस्था काढण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतला होता. राणे हे माजी मुख्यमंत्री असल्याने विशेष सुरक्षा पथकाच्या गराड्यात वावरत होते. राज्य सरकारने हे सारे सुरक्षारक्षक कमी केले. त्यामुळे राणे यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांची Y दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. त्यामुळे तब्बल अकरा जवान हे राणेंच्या तैनातीला राहतील. 

राज्य सरकारकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार नारायण राणे यांची वाय प्लस सुरक्षा दिली जात होती. मात्र काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या नव्या निर्णयानुसार ही सुरक्षा रद्द करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारने त्यांच्या अधिकारात राणेंची सुरक्षाव्यवस्था कायम ठेवली. 

महत्त्वाचे असणारे मात्र तुलनेने कमी धोका असेलेल्या व्यक्तींना वाय श्रेणीची सुरक्षा दिली जाते. या व्यवस्थेत एकूम 11 सुरक्षा रक्षक असतात. ज्यामध्ये दोन प्रशिक्षित जवान असतात.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने कमी केली होती. तसेच  फडणवीसची सुरक्षा झेड + होती ती आता वाय + केली होती.  अमृता फडणवीस यांची सुरक्षा अगोदर वाय प्लस ती आता एक्स केली आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ कार काढून टाकण्यात आली. राज ठाकरे यांच्याकडे पूर्वी झेड सुरक्षा होती. ती आता Y + करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवलेंची वाय + सुरक्षा आत्ता विना एस्कॉर्टशिवाय असेल.  भाजप नेते आशिष शेलार यांना वाय + सुरक्षा होती. ती आता वाय करण्यात आली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख