शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीबाबत नाना पटोले म्हणाले.. - Nana Patole reaction meeting held at Sharad Pawar house   | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीबाबत नाना पटोले म्हणाले..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

काँग्रेसचा विस्तार करण्याची जबाबदारी माझ्यावर पक्षाने दिली आहे.   

मुंबई : काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची काल भेट घेतली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते. याबाबत नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाना पटोले म्हणाले, ''शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीचे मला आमंत्रण नव्हते. ओबीसी आरक्षणांच्या मुद्दांवरुन काँग्रेस नेत्यांसोबत ही बैठक झाली.''

नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मंत्रिमंडळात बदल करण्याचे निर्णय हायकमांड घेतात. मंत्रीबदलाबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही.  २०१४ च्या निवडणुकी प्रमाणे धोका होऊ शकतो म्हणून स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे. आगामी काळात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता येईल. काँग्रेसचा विस्तार करण्याची माझ्यावर पक्षाने जबाबदारी दिली आहे.   

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पटोले यांनी यावेळी टिका केली. पटोले म्हणाले, ''फडणवीसांनी बहुजन समाजातील नेत्यांचे नुकसान केलं. फास बनवून अनेकांना अडविण्याचा प्रयत्न फडणवीस करीत असतात.''

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील वातावरण ढवळून निघाले आहे. काल काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत पटोलेंच्या या विधानावर चर्चा झाली. बैठकीनंतर एच.के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.  

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात पुढाकार घेणारे शरद पवार (Sharad Pawar) हे पटोलेंच्या विधानामुळे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. पवारांची नाराजी दूर करण्याची काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पवार यांची भेट घेतली. तुम्ही खरंच सगळ्या निवडणुका एकटेच लढणार का? तुमचा निर्णय झाला असेल तर ते स्पष्ट सांगा, असं शरद पवार काँग्रेच्या नेत्यांना म्हणाले आहेत.

''प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तो वाढवला देखील पाहिजे. मात्र ज्या पक्षांसोबत आपण सत्तेत आहोत ते पक्ष दुखावले जाणार नाहीत, सरकारमध्ये कटुता येणार नाही. अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात,'' असे पवार यांनी काँग्रेस नेत्यांना सांगितले असल्याचं वृत्त आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख