नाना पटोले दिल्लीत; राहुल गांधींची घेतली भेट...  - Nana Patole meet congress leader Rahul Gandhi after elected as a state president | Politics Marathi News - Sarkarnama

नाना पटोले दिल्लीत; राहुल गांधींची घेतली भेट... 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

नाना पटोले कृषी कायद्यांविरोधात टिकरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही भेटणार आहेत.

नवी दिल्ली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिल्लीत खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. पटोले यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी यांना भेटून आभार मानले. दरम्यान, कृषी कायद्यांविरोधात टिकरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही भेटणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. ते शुक्रवारी (ता. १२ फेब्रुवारी) दुपारी २.३० वाजता ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत. प्रदेशाध्यपदाचा पदभार स्वीकारण्याचा जाहीर कार्यक्रम अनेक वर्षात प्रथमच होत आहे.

पदभार स्वीकारण्यापूर्वी पटोले आज दिल्लीत पोहचले. निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच दिल्लीला गेले आहेत. त्यांनी खासदार राहुल गांधी यांची भेट घेत नियुक्तीबद्दल आभार मानले. काही वेळात ते दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनालाही भेट देणार आहेत. 

ऐतिहासिक क्रांती मैदानावर स्वीकारणार पदभार

दरम्यान, अॉगस्ट क्रांती मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवतील. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते, राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दु. आ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नाना पटोले यांनी  (४ फेब्रुवारी) रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या नंतर (५ फेब्रुवारी रोजी) काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. त्यानुसार आता ते (ता. १२ फेब्रुवारी) रोजी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष व उपाध्यक्षही पदभार स्वीकारणार आहेत. 

पक्ष संघटनेत सहा कार्याध्यक्ष

काँग्रेस पक्षाला 2009 मध्ये राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नानांची बंडखोर नेता अशी प्रतिमा आहे. ते भाजपकडून एखदा आमदार व खासदार झाले. पक्षसंघटनेतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा पक्षात प्रदेशाध्यक्षपद मिळवणारे नाना हे राज्यातील आतापर्यंतचे एकमेव नेते ठरले आहेत. इतर पक्षांतून आलेल्यांना एक वेळ मुख्यमंत्री, मंत्री करतील पण पक्षाचा प्रदेशाध्यक्ष काँग्रेसमध्ये करणार नाही, हा समज पटोलेंच्या नियुक्तीने दूर झाला आहे.

पटोलेंना सहकार्य करण्यासाठी सहा कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात माजी मंत्री शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद अरीफ नसीम खान, आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि आमदार प्रणीती शिंदे यांना कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहे.

याशिवाय उपाध्यक्ष म्हणून शिरीश चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजित कांबळे, कैलास गोरंट्याल, भा. ई. नगराळे, शरद आहेर, एम. एम. शेख आणि माणिक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख