भाजप शासित राज्यात प्रेताचे खच पडत आहेत...त्याबाबत हर्षवर्धन काय बोलणार ? पटोलेंचा सवाल - Nana Patole criticizes Union Health Minister Harshvardhan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

भाजप शासित राज्यात प्रेताचे खच पडत आहेत...त्याबाबत हर्षवर्धन काय बोलणार ? पटोलेंचा सवाल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 एप्रिल 2021

लोकांचा जीव धोक्यात आहे. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा,'' असे नाना पटोले यांनी सांगितले.

मुंबई : ''केंद्र सरकारने रेमडेसिविर आणि ऑक्सिजन पुरवठा यावर कोणतेही राजकारण करू नये, ज्या कंपन्यांना रेमडेसिवीरचे कंत्राट दिले आहे, ते त्यानुसार पुरवठा करत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करु. कारवाई होईल पण हा पुरवठा राज्याला मिळत नसल्याने अनेक लोकांचा जीव धोक्यात आहे. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा,'' असे कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते.

पटोले म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहलं होतं. त्या पत्राला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उत्तर दिलं आहे.  त्यात म्हटलं काँग्रेस शासित राज्यात वाईट परिस्थिती आहे, त्यांना सल्ला द्या. केंद्राचे पत्र नवाब मलिक यांनी जाहीर केलं आहे, हा आरोप नाही त्यात वस्तुस्थिती आहे. काँग्रेसने या महामारीत कधीच राजकारण केले नाही आम्ही लोकांसाठी काम करत आहोत. भाजपची सत्ता असलेल्या काही राज्यात कोर्टाने हस्तक्षेप केला आहे. तिथे प्रेताचे खच पडत आहेत, त्याबाबत हर्षवर्धन काय बोलणार ?

''रेमडेसिवीर बाबत राज्य सरकारने टेंडर काढले होते. दरदिवशी ५० हजार रेमडेसिवीर राज्याला दिल्या जातील, असं दोन कंपन्यांनी कळवलं होतं. आता मात्र त्यांनी हा पुरवठा १००० - ५०० वर आणला आहे. राज्य सरकारने या कंपन्यांबरोबर करार केला होता. केंद्र सरकारने या कंपन्यांवर दबाव टाकला आहे का, '' असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे. 

राज्याला रेमडेसिवीर मिळू नये आणि इथली स्थिती बिघडावी अशा प्रयत्न विरोधकांचा आहे.  केंद्राच्या आरोग्यमंत्र्यांनी राज्यांवर जबाबदारी ढकलली आहे, हे केंद्रं सरकारचे अपयश आहे. लसीकरण, रेमडेसेवीर, ऑक्सिजन या सगळ्या गोष्टीत केंद्राने तातडीने हस्तक्षेप करून देशातील प्रत्येक राज्याला या गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात.
  
"दिल्लीत एक पप्पू आहे, आणि राज्यात नाना पटोले हे पप्पू आहेत, असे व्यक्तव्य  फडणवीस यांनी केले होते, याबाबत नाना पटोले म्हणाले की , कुणाला फेकू म्हटलं जातं, कुणाला तडीपार म्हटलं जातं, कुणाला टरबुजा म्हटलं जातं, कुणाला चंपा म्हटलं जातं. पण कुणाच्या नावाचा अपभ्रंश करून उल्लेख करण्याची काँग्रेसची, महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यांनी आम्हाला काही म्हटलं तरी राहुल गांधी आणि हा नाना पटोले लोकांच्या हिताचे काम करेल.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख