नाना पटोलेंचा भाजपला सल्ला : मोदींच्या विरोधातच आंदोलन करा

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC political Reservation) मुद्द्यावर आंदोलनाची नौटंकी करून भारतीय जनता पक्षाला (BJP) आपले पाप झाकता येणार नाही.
नाना पटोलेंचा भाजपला सल्ला : मोदींच्या विरोधातच आंदोलन करा
nana patole 1.jpg

मुंबई : ''ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC political Reservation) मुद्द्यावर आंदोलनाची नौटंकी करून भारतीय जनता पक्षाला (BJP) आपले पाप झाकता येणार नाही. हिंमत असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या विरोधात आंदोलन करावे, असे म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले  (Nana Patole) यांनी भाजपावर टिकास्त्र डागले आहे. ''आधी केंद्र सरकराने जातनिहाय जनगणनेची आकडेवारी दिली नाही. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former CM Devendra Fadnavis) यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या. त्याने फक्त महाराष्ट्राच नाही तर देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी आहेत,'' अशा सडेतोड शब्दात नाना पटोलेंनी भाजपाचा समाचार घेतला आहे. 

ओबीसी आरक्षण प्रश्नी भाजपाच्या वतीने आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. भाजपाच्या या आंदोलनाचा नाना पटोलेंनी  समाचार घेतला आहे. ''केंद्र सरकारकडे जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी असतानाही ती राज्य सरकारांना दिली नाही. ओबीसी आरक्षणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचा इम्पीरिकल डेटा मागितला होता. मात्र केंद्र सरकारने जाणीवपूर्वक डेटा देण्याचे टाळले. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पीरीकल डेटाची मागणी केली होती. मात्र त्यावेळीही केंद्र सरकारने ओबीसींचा डेटा दिला नाही. या कारणांमुळे न्यायालयात ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले. त्यामुळे हे  आरक्षण रद्द होण्यात  केंद्र सरकार सह फडणवीस सरकारही जबाबदार आहे.  दरम्यान 2017 मध्येही देवेंद्र फडणवीसांनी एक परिपत्रक काढून नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक फडणवीस  पुढे ढकलली. नंतर इतर जिल्हा परिषदांनी न्यायालयात धाव घेतल्याने आरक्षणाचा गुंतावाढत गेला, ज्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले.

''राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशा-यावर चालणा-या भाजपाची विचारधाराच आरक्षण विरोधी आहे.  ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करुन 
ओबीसींना सत्तेपासून वंचित ठेवण्याचा त्यांचा डाव आहे. भाजपाच्या या भूमिकेमुळेच आरक्षणाचा मुद्दा शिगेला पोहचला आणि त्याचा सर्व दोष मात्र 
 राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला देण्यात आला. भाजपाचे हा ढोंगीपणा बहुजन समाजाच्या लक्षात आला आहे.'' असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

भाजपाच्या या खेळीमुळे आज ओबीसी समाजातील नेतृत्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  पाच वर्ष सत्तेत असताना फडणवीसांनी झोपा काढल्या आणि आता आंदोलने करून ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत. भाजपाला जर ओबीसी समाजाप्रती आपुलकी असती तर ही वेळच त्यांनी  येऊ दिली नसती. भाजपाचे  पितळ उघडे पडल्यामुळे आता ते आपल्याला ओबीसी समाजाच्या हिताची किती चिंता आहे हे दाखवण्यासाठी हा खटाटोप करत आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in