खासदार डेलकर आत्महत्याप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा  - mumbai police registers fir in case of death of mp mohan delkar | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार डेलकर आत्महत्याप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 मार्च 2021

खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत 22 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. मोहन डेलकर यांच्या मृत्यूप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेलकर मुंबईतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडले होते. 

डेलकर यांनी त्यांच्या लेटरहेडवर 15 पानांची सुसाईट लिहिली होती. तपासणीतही ते डेलकर यांचेच हस्ताक्षर असल्याचे निष्पन्न झाले आहे. डेलकर यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांचे हस्ताक्षर ओळखले आहे. 

डेलकर आत्महत्या प्रकरणात ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, संदीप सिंग, अपूर्व शर्मा, मनस्वी जैन, मनोज पटेल, रोहित यादव, फत्तेसिंग चौहान, दिलीप पटेलस शरद दराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नऊ जणांनी 
डेलकरांना वेळोवेळी अपमानीत केले त्यांच्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

 

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने डेलकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यातही ती आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. अद्याप मुख्य अहवाल येणे बाकी आहे. कुटुंबीयांच्या फिर्यादी नंतर याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

अनेक स्थानिक कार्यक्रमात त्यांना बोलवले जात नव्हते, मोहन डेलकर यांना वेळोवेळी अपमानीत केले जात होते. याबाबत त्यांनी संसदेत आवाज उठवला होता. यावेळी काही स्थानिक अधिकाऱ्यांवर त्यांनी आरोप केला होता. या संदर्भात त्यांनी नितीश कुमार यांची भेटही घेतली होती. यावर  एक समिती स्थापन केली होती. मात्र त्या पूर्वीच मोहन यांनी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी देलकर यांनी 15 पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. गुजराती भाषेत ही सुसाईड नोट लिहिली होती.
 
दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्या नावाच उल्लेख डेलकर यांनी त्या चिठ्ठीत प्रामुख्याने केला आहे. पटेल आणि काही अधिकाऱ्यांच्या दबावाखाली मला त्रास देण्यात येत होता, अडचणी येत होत्या आणि सामाजिक जीवनातून उध्वस्त करण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या, असे डेलकर यांनी आपल्या चिठ्ठीत लिहून ठेवल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल सभागृहात दिली. प्रफुल्ल खेडा पटेल हे गुजरातचे माजी गृहमंत्री आहेत. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच पटेल हे गृहमंत्री होते, अशीही देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र शासन यांच्यावर माझा विश्वास आहे. मला न्याय मिळेल म्हणून मी मुंबईमध्ये आत्महत्या करत असल्याचे डेलकर यांनी लिहून ठेवले. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन, पुत्र अभिनव यांनी सुद्धा मला पत्र लिहिले आहे. त्या पत्रातही त्यांनी प्रफुल्ल खेडा पटेलांवर आरोप लावले आहेत. माझे वडिल हे प्रचंड दबावाखाली होते, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे, अशी माहिती देशमुख यांनी काल दिली. डेलकर यांच्या मुलाचाही महाराष्ट्राच्या प्रशासनावर त्यांचा विश्वास असल्याचे यातून दिसते. त्यामुळे डेलकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाची चौकशीसाठी विशेष पथक नेमण्यात येणार असल्याची घोषणा देशमुख यांनी केली. 
Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख