कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मुंबई पालिकेस जाग; मुख्यालयात कायमस्वरूपी रुग्णवाहिका  - Mumbai Municipality wakes up after employee death; Permanent ambulance at headquarters | Politics Marathi News - Sarkarnama

कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मुंबई पालिकेस जाग; मुख्यालयात कायमस्वरूपी रुग्णवाहिका 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 2 ऑगस्ट 2020

मुंबई महापालिका मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक चिटणीस अजित दुखंडे यांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग आली आहे. आता महापालिका मुख्यालयात रुग्णवाहिका कायमस्वरूपी तैनात ठेवली जाणार आहे. दवाखान्यात ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटरची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक चिटणीस अजित दुखंडे यांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग आली आहे. आता महापालिका मुख्यालयात रुग्णवाहिका कायमस्वरूपी तैनात ठेवली जाणार आहे. दवाखान्यात ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटरची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

अजित दुखंडे यांना 29 जुलै रोजी मुख्यालयातच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर सुमारे तासभर दुखंडे हे बेशुद्ध अवस्थेत महापालिकेत पडून होते. कारण, त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी तब्बल तासभर रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नव्हती. वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागला होता. 

यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक मेराज शेख यांनाही महासभा सुरू असताना अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हा त्यांना खासगी वाहनाने रुग्णालयात नेले होते. दुखंडे यांच्या मृत्यूमुळे महापालिकेतील वैद्यकीय सेवेबद्दल पुन्हा एकदा प्रश्‍न निर्माण झाले आहेत. 

भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मुख्यालयात कायमस्वरूपी रुग्णवाहिका तैनात ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांची भेट घेऊन मुख्यालयातील दवाखाना अद्ययावत करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार या दवाखान्यात व्हेंटिलेटर तसेच ऑक्‍सिजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे जाधव यांनी सांगितले. या दवाखान्यात सध्या ऍलोपथी आणि आयुर्वेदाच्या प्रत्येकी एका डॉक्‍टरची नियुक्ती आहे. 

दुखंडे कुटुंबास 50 लाखांची मदत देण्याची मदत 

अजित दुखंडे यांचा मृत्यू झाला, त्याच दिवशी त्यांच्या मुलाचा दहावीचा निकाल लागला होता. त्याला 80 टक्के गुणही मिळाले होते. दुखंडे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुखंडे यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबात कोणीही कमावता नाही. दुखंडे यांच्या मृत्यूस प्रशासकीय दिरंगाई जबाबदार असून त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. 
 

हेही वाचा : भिवंडीत बंदोबस्तावरील पोलिसावर हल्ला

भिवंडी : भिवंडी शहरातील भंडारी कंपाउंड चौक येथे शनिवारी (ता. 1 ऑगस्ट) रात्री तरुणांमध्ये झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसावर धारदार चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. भोईवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कल्याण कर्पे यांनी तातडीने गुन्हा दाखल करून अवघ्या आठ तासांमध्ये म्हणजेच रविवारी (ता. 2 ऑगस्ट) पहाटे ठाणे येऊर येथून दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. 

दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रवींद्र धनाजी भोसले (वय 20) व लखन अंकुश जाधव (वय 20, दोघेही रा. देवजी नगर, नारपोली) अशी हल्लेखोरांची नावे आहेत. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख