Mumbai bjp president mangalprabhat lodha visits rajgrah and supports ambedkar family | Sarkarnama

मुंबई भाजप ठामपणे आंबेडकर कुटुंबियांच्या पाठीशी : मंगलप्रभात लोढा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 जुलै 2020

प्रक्षोभक घटनेनंतरही आंबेडकर कुटुंबीयांनी समाजाला जे शांततेचे आवाहन केले आणि जो संयम दाखवला तो अतिशय कौतुकास्पद आहे असे श्री. लोढा यांनी सांगितले.

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील 'राजगृह' या निवासस्थानी काही अज्ञात व्यक्तींनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मुंबई भाजपने तीव्र निषेध केला आहे. 

आंबेडकर कुटुंबियांना पाठिंबा देण्याकरिता मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज 'राजगृह'ला भेट दिली.  श्री. भीमराव आंबेडकर यांच्याशी त्यांनी अर्धा तास चर्चा केली. हीन कृत्यात सामील असलेल्या गुन्हेगारांना त्वरित अटक करावी तसेच या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबई भाजप ठामपणे आंबेडकर कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे, असेही त्यांनी सांगितले. 

शासनाने 'राजगृह'ची सुरक्षा तातडीने वाढवावी. या घटनेमागे कोणाचा हात आहे किंवा काय षडयंत्र आहे, त्याची सखोल चौकशी शासनाने केली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे. या प्रक्षोभक घटनेनंतरही आंबेडकर कुटुंबीयांनी समाजाला जे शांततेचे आवाहन केले आणि जो संयम दाखवला तो अतिशय कौतुकास्पद आहे असे श्री. लोढा यांनी सांगितले.

यावेळी श्री. लोढा यांच्यासोबत माजी मंत्री भाई गिरकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार  सुनील राणे, भाजप मुंबई सचिव विजय पगारे, भाजप मुंबई अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष मयूर देवळेकर, भाजप दक्षिण मध्य जिल्ह्याध्यक्ष राजेश शिरवडकर हे उपस्थित होते.  

रामदास आठवले यांनीही केली मागणी 

मुंबई :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक वास्तूवर झालेल्या हल्ल्याच्या तीव्र निषेध करून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या हल्ल्याची सीआयडी द्वारे चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविले आहे. 

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ निवासस्थान आहे. त्यामुळे राजगृह ही पवित्र वास्तू आहे. ही वास्तू ग्रंथांसाठी म्हणून उभारलेली एकमेव वास्तू ठरू शकते. जगभरातील आंबेडकरी अनुयायांचे राजगृह प्रेरणास्थान, ऊर्जास्थान आहे. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असणा-या राजगृह या वास्तूवर हल्ल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे. राजगृहाचा अवमान करण्याचा हा पहिलाच निंदनीय प्रकार आहे. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा करावी. या मागे कुणाचा हात आहे हे शोधण्यासाठी या हल्ल्याची सीआयडीद्वारे सखोल चौकशी करावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ निवासस्थान आहे. त्यामुळे राजगृह ही पवित्र वास्तू आहे. ही वास्तू ग्रंथांसाठी म्हणून उभारलेली एकमेव वास्तू ठरू शकते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख