पोलिस अधिकारी पवारांना भेटले, तर विरोधी पक्षाच्या पोटात मुरडा का उठतोय?  - MP Sanjay Raut criticizes BJP leaders | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस अधिकारी पवारांना भेटले, तर विरोधी पक्षाच्या पोटात मुरडा का उठतोय? 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

हनिट्रॅपचा जो प्रकार आहे, तो महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हता.

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आहेत, त्यामुळे या गंभीर प्रकरणाबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना बोलावून घेतली, तर विरोधी पक्षाच्या पोटात का मुरडा उठतोय? जे संविधानिक पदावर आहेत, ते किती घटनेनुसार वागतात, यावरही विरोधी पक्ष बोलणार का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारला. 

धनंजय मुंडे प्रकरणानंतर मुंबई पोलिस दलातील काही अधिकारी शरद पवारांना भेटायला गेले होते. त्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांनी टीका केली होती. संविधानिक पदावर नसतानाही मुंबई पोलिस दलातील अधिकारी पवारांना ब्रिफिंग करायला का जातात? असा प्रश्‍न विचारला होता. त्यावर राऊतांनी वरील उत्तर दिले. 

मुंडे यांच्या प्रकाराबाबत राऊत म्हणाले की, "घाईघाईने कोणताही निर्णय घेतला जाऊ नये. तो अधिकार पवारांचा आहे. पण काही लोकांनी परस्पर ठरवले. जसे की ते कायदा आणि तेच कोर्ट आहेत. तेच कोणाला आरोपी करायचे, कोणाला शिक्षा ठोठावची. पदावरून कोणाला खाली खेचायचे, हे परस्पर ठरवतात. अशा प्रवृत्तींना उत्तेजन मिळून म्हणून अशा प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली पाहिजे.'' 

"मुंडे प्रकरणाला कालपासून जी कलाटणी मिळाली आहे. तक्रारदार जी व्यक्ती आहे, तिच्याबाबतीत सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक तक्रारदार आहेत. तेच प्रकरण आता जास्त गंभीर वाटायला लागलं आहे. हे प्रकरण नुसतं गंभीर नाहीतर धक्कादायक आहे. हनिट्रॅपचा जो प्रकार आहे, तो महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हता. अलीकडे म्हणजे गेल्या वर्षभरापासून जे चिखलफेक, बदनाम करण्याचे राजकारण चाललं आहे, त्यातून असे प्रकार वाढीस लागले असतील तर त्याच्यात व्यक्तीची बदनामी नसून ती महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची बदनामी आहे, असे मला वाटते. त्यामुळे या प्रकरणात मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेऊ नये, या मताचा मी आहे आणि ती सर्वांची भावना आहे, त्याच भावनेचा पवारांनी आदर केला आहे, असे मला वाटते,'' असे राऊतांनी नमूद केले. 

"पोलिस आणि कायदा त्यांचं काम करत असतात. सरकार आहे, गृहमंत्रालय आपल्याकडे आहे; म्हणून कायद्याच्या पुढे कोणी नाही. तपास सर्व बाजूंनी व्हायला हवा, तो एकतर्फी होता कामा नये. कोणीही उठले आणि खोटेनाटे आरोप करत असतील आणि त्यावर विरोधी पक्ष राजीनामा मागत असेल तर महाराष्ट्रात अशा प्रवृत्तीचा बिमोड व्हायला पाहिजे,'' असंही व्यक्तव्य खासदार राऊतांनी केले.

 ते म्हणाले, "या प्रकरणाचा महिला पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची पवारांची मागणी अत्यंत योग्य आहे. कारण, आरोप एका महिलेने केला आहे. देशाच्या प्रमुखांनीही शपथपत्रात माहिती लपवल्याचा प्रकार घडलेला आहे. त्याबाबत राऊत म्हणाले की काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये. एखादा दगड तुमच्याही घरावर बसेल, तेव्हा सर्व महाल कोसळून नेस्तानाबूत होईल. हा मंत्र देशातील सर्वांसाठी लागू आहे.'' 

"विरोधी पक्ष कोणताही असो, त्यांनीसुद्धा भान, संयम ठेवला पाहिजे. आपणसुद्धा कधी काळी राज्यकर्ते होतो, राजकारणात आहोत आणि हमाम सब नंग होते है, याचं भान राखलं पाहिजे. आम्ही नीतीमत्ता, संयम पाळतो. नीतीमत्ता तुम्ही किती पाळता, याचा हिशेब करायला कोणी बसलं तर सर्वांना त्रास होईल,'' असा इशारा त्यांनी विरोधी पक्षाला दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख