MP Rahul shevale alleges some bollywood artist supporting money to ISI | Sarkarnama

आयएसआयला पैसे पुरवणाऱ्या कार्यक्रमात बॉलीवूड कलाकार : खासदार शेवाळेंचा वार

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 23 जुलै 2020

ह्युस्टन येथील भारतील राजदूतांनी रेहान सिद्धिकी, राकेश कौशल तसेच दर्शन मेहता यांच्याबाबत चौकशी केली आहे. चौकशीचा अहवाल पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालयाला सुपूर्द करण्यात आला आहे. त्यात सिद्धिकी, कौशल आणि मेहता यांच्यावर देशविरोधाचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच, भारतीय हिंदी सिनेमा कलाकारांसह सर्व कलाकारांना त्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास मनाई केली आहे.

मुंबई : अमेरिकेत बॉलीवूड कार्यक्रम आयोजित करणारा रेहान सिद्धिकी यातून येणारा पैसा पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेला पुरवत असल्याचा संशय व्यक्त करत केंद्र सरकारने भारतीय कलाकारांना सिद्धिकीसह राकेश कौशल आणि दर्शन मेहता यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास मनाई केली आहे. त्यासोबतच सिद्धिकीच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या भारतीय कलाकारांची सक्तवसुली संचनालय आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही चौकशीचे आदेश दिले असल्याचे आज पत्रकारांना सांगितले. 

ह्युस्टन येथील भारतील राजदूतांनी रेहान सिद्धिकी, राकेश कौशल तसेच दर्शन मेहता यांच्याबाबत चौकशी केली आहे. चौकशीचा अहवाल पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालयाला सुपूर्द करण्यात आला आहे. त्यात सिद्धिकी, कौशल आणि मेहता यांच्यावर देशविरोधाचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच, भारतीय हिंदी सिनेमा कलाकारांसह सर्व कलाकारांना त्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास मनाई केली आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी पत्राद्वारे राहुल शेवाळे यांना ही माहिती दिली आहे. ह्युस्टनसह वॉशिंग्टन डीसी येथील दूतावासामार्फतही या सूचना केल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, फक्त कार्यक्रमात सहभागी होण्यास मनाई न करता आतापर्यंत या आरोपींच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांची ईडी आणि एनआयएमार्फत चौकशी करण्याची मागणी शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

काय आहे प्रकरण
राहुल शेवाळे यांनी तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सिद्धिकी आणि त्याच्या साथीदारांबाबत तक्रार केली होती. बॉलीवूड कार्यक्रम आयोजित करून सिद्धिकी त्याचे पैसे आयएसआयला पुरवतो. तसेच तो आपले रेडिओ चॅनल आणि समाज माध्यमावरून भारताविरोधात प्रचार करत असल्याचे शेवाळे यांनी म्हटले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून त्यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती. या पत्राची दखल घेऊन केंद्र सरकारने ह्युस्टन येथील दूतावासाला चौकशीचे आदेश दिले होते, असा दावा शेवाळे यांनी केला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख