सचिन वाझेंचा पाय आणखी खोलात; पोलिस सेवूनत काढण्याच्या हालचाली

सूत्रांच्या माहितीनुसार एनआयएने सचिन वाझेंना अटक केल्यानंतर ही प्रक्रिया सुरु झाली.
 Sachin Waze .jpg
Sachin Waze .jpg

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेले स्फोटक आणि मनसुख हिरेण मृत्यू प्रकरणात अटकेत असलेले निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंना आता पोलिस सेवेतून काढण्याची प्रक्रिया मुंबई पोलिसांनी सुरु केली आहे. सचिन वाझेविरोधात भारतीय संविधान, 1949 च्या कलम 311 अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार एनआयएने सचिन वाझेंना अटक केल्यानंतर ही प्रक्रिया सुरु झाली. सचिन वाझेंची अखेरची पोस्टिंग स्पेशल ब्रान्चमध्ये झाली होती, त्यामुळे ही प्रक्रिया संबंधित विभागाची जबाबदारी आहे, असे अधिकारी म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वीच स्पेशल ब्रान्चचे अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांनी महाराष्ट्र एटीएस आणि एनआयएला पत्र लिहून सचिन वाझेंच्या या प्रकरणातील समावेशासंबंधित कागदपत्रांची मागणी केली होती, त्यामध्ये एफआयआर कॉपीचाही उल्लेख होता, अशी माहिती आहे.

ही कागतपत्रे सोमवारीच (12 एप्रिल) स्पेशल ब्रान्चला सोपवण्यात आली आहेत. यानंतर आता स्पेशल ब्रान्चचे अधिकारी यावर आपला अहवाल बनवून राज्य सरकारला पाठवतील आणि वाझेंवर भारतीय संविधानाच्या कलम 311 अंतर्गत कारवाई करण्याची परवानगी मागतील. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही सचिन वाझेशी संबंधित एक अहवाल मुंबई पोलिसांना दिला आहे.

मुंबई पोलिसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला अहवाल मिळाला आहे, जो आम्ही आता लीगल सेलला पाठवू आणि पुढील प्रक्रिया सुरु केली जाईल. जर सचिन वाझेंविरोधात दिलेल्या अहवालाशी सरकार सहमत असेल तर त्यांना सेवेतून काढले जाईल.

या प्रक्रियेशिवाय मुंबई क्राईम ब्रान्चने देखील अंतर्गत समिती तयार केली आहे. ज्यात त्यांना समजले की, वाझेंनी अनेक जणांकडून लाच घेतली आहे आणि या लोकांची नावे टीआरपी घोटाळा, फेक फॉलोअर्स, फेक कॉल सेंटर, क्रिकेट बेटिंग आणि दिलीप छाब्रिया प्रकरणांत आले असल्याचे समजते. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणांचा तपास सीआययूचे पथक करत होते आणि सचिन वाझे हे सीआययूचे इन्चार्ज होते.

टीआरपी घोटाळ्यात मनी लॉड्रिंगच्या दृष्टीने ईडी तपास करत आहे. ईडीलाही तपासात समजले होते की, सचिन वाझेंनी BARC च्या लोकांकडून 30 लाख रुपये घेतले होते. त्यामुळे ईडी देखील आपला अहवाल महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरोला सोपवणार आहे. जेणेकरुन वाझेंविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई करता येऊ शकते.

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com