मंत्र्यांनी फसवणूक केल्याचा आरोप : शासकीय निवासस्थानी आंदोलन

आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात श्रमजीवी संघटनेने अचानकपणे आंदोलन करत मंत्रालय परिसर हादरवून टाकला.
 Minister, K. C. Padvi, .jpg
Minister, K. C. Padvi, .jpg

मुंबई : खावटी योजनेची फसवी घोषणा करून आदिवासींच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या शासकीय निवासस्थानी मंगळवार (ता. ९ मार्च ) संतप्त श्रमजीवी आदिवासींनी आंदोलन करत घोषणाबाजी आणि निदर्शने केली.  

खावटी योजना आश्वासन देऊन, घोषणा करून, उचन्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करूनही खावटी बाबत आदिवासींची फसवणूक करणाऱ्या आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात श्रमजीवी संघटनेने अचानकपणे आंदोलन करत मंत्रालय परिसर हादरवून टाकला. खावटी योजनेचा लाभ गरजू लाभार्थी आदिवासींना मिळावा यासाठी लढणाऱ्या आंदोलकांना मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केले आहे. 

दरम्यान, खावटी योजनेबाबत आदिवासींची फसवणूक करणाऱ्या आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात रविवार (ता. ७ मार्च) ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक या चार जिल्ह्यात एकाच वेळी 45 पोलिस ठाण्यांमध्ये आयपीसी कलम 420 ची फिर्याद दाखल केली होती.

श्रमजीवी संघटनेच्या वतीने या बाबत आदिवासी विकास मंत्र्यांनी आदिवासींच्या केलेल्या या फौजदारी स्वरूपाच्या फसवणुकीबाबत निषेध व्यक्त केला. प्रत्येक तालुक्यातील पोलिस ठाणे हद्दीतील खावटीच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी कातकरी लाभार्थ्यांनी स्वतः फिर्याद दाखल केली होती.

मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन झाल्याने सर्वांचाच रोजगार हिरावला गेला, या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या आदिवासींच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी सदर प्रश्नावर राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री) दर्जा तथा, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी प्रयत्न केले, एकीकडे सामाजिक बांधिलकी मधून श्रमजीवी संघटनेने काम केले, दुसरीकडे विवेक पंडित यांनी स्वतः न्यायालयात जात न्यायपालिकेकडे या विषयाबाबत दाद मागितली. त्यानंतर सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र देखील  दाखल केले होते.

सर्व तालुक्यांत (ता. २६ ते ३०) मे पर्यंत हक्काग्रह आंदोलन व (३१ मे ते १ जुन २०२०) मध्ये संघटनेचे संस्थापक विवेक पंडित व विद्युल्लता पंडित यांच्या प्रमुख सहभागासह व सर्व तालुक्यांत अन्न सत्याग्रह आंदोलन केल्यावर १ जुनला शासनाने लेखी आश्वासन दिल्यावर संघटनेने आंदोलन स्थगीत केले. या मागणीला खावटी या नावाने शासनाने जाहीर केले. मात्र, प्रत्यक्ष शासननिर्णय पारित व्हायला ९ सप्टेंबर पर्यंत प्रतिक्षा करावी लागली. जून महिन्यात मिळालेल्या आश्वासनावर 9 सप्टेंबर 2020 पर्यंत परिपत्रक निघाले. त्यानंतर 20 सप्टेंबर 2020 लाही परिपत्रक निघाले. मात्र, आजपर्यंत या परिपत्रकाची अंमलबजावणी होऊ शकली नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही विवेक पंडित यांनी भेट घेत खावटी योजनेबाबत लक्ष वेधले, त्यांच्या समोरच आदिवासी विकास मंत्र्यांनी आश्वासन दिले, मात्र अंमलबजावणी होऊ शकली नाही. याबाबतही श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी संताप व्यक्त केला आहे. खावटी योजना जाहीर करून शब्द फिरविणाऱ्या, आदिवासींची घोर फसवणूक करणाऱ्या आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या विरोधात आता श्रमजीवी आक्रमक पावित्र्यात असेल हे मात्र निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com