Mla amit satam raises issue of bkc covid hospital contruction rates | Sarkarnama

बीकेसीमधील कोरोना रुग्णालयाच्या उभारणीत 8 कोटींचा घोटाळा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 जून 2020

भाजप आमदार अमित साटम यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम करताना 40 टक्के जादा दर कंत्राटदाराला दिला असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. 

मुंबई : 'एमएमआरडीए'ने बीकेसीमध्ये पहिल्या टप्प्याचे तात्पुरते कोरोना रुग्णालय उभारताना अत्यंत घाईघाईने अन हलगर्जीपणे कंत्राटदाराला जादा दराने काम बहाल केले, असा आरोप अंधेरी (प.) चे आमदार अमित साटम यांनी केला आहे. या विषयावर एमएमआरडीएने दिलेले स्पष्टीकरणही त्यांनी खोडून काढले आहे.  

कोरोना रुग्णालयासाठी एमएमआरडीए मैदानात बांधलेल्या रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन नुकतेच झाले. मात्र आता पहिल्या टप्प्याच्या रुग्णालयाचे बांधकाम वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. भाजप आमदार अमित साटम यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम करताना 40 टक्के जादा दर कंत्राटदाराला दिला असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. 

सुमारे एक हजारांहूनही जास्त कोरोना रूग्णांवर उपचार व्हावेत यासाठी या रुग्णालयाचा पहिला टप्पा उभारण्यात आला आहे. त्याला वीस कोटी रुपयांचा खर्च आला. मात्र एमएमआरडीएने रीतसर निविदा मागवल्या असत्या तर हे रुग्णालय जेमतेम अकरा ते बारा कोटी रुपयांत उभारून झाले असते, असा साटम यांचा दावा आहे. या रुग्णालयाचे मुख्य बांधकाम साडेनऊ कोटी रुपयांमध्ये करण्यात आले. मात्र हे काम पावणेसहा कोटी रुपयांमध्ये करणे शक्य होते. म्हणजे इथेच कंत्राटदाराला पावणेचार कोटी रुपये जास्त देण्यात आले असा त्यांचा दावा आहे. 

आर एम बी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने दिलेल्या कोटेशन नुसार पाच कोटी 67 लाखात हे मुख्य बांधकाम करता आले असते असे साटम यांचे म्हणणे आहे.

रुग्णांसाठी खाटा, गाद्या, चादरी, उशांची कव्हर आदींसाठी एमएमआरडीएने दहा टक्के ते 47 टक्के जास्त रक्कम मोजली असाही आरोप साटम यांनी केला आहे. आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी इतर रुग्णालयांसाठी इतर कंपन्यांनी दिलेल्या स्वस्त दराच्या रकमेची टेंडरही सादर केली आहेत.

'डिझास्टर मॅनेजमेंट प्रोटोकॉल'च्या इमर्जन्सी क्लॉज नुसार या कामासाठी निविदा मागवण्याची गरज नव्हती. मात्र आम्ही यासाठी कोटेशन मागवली होती, लॉकडाऊन असताना आम्ही हे रुग्णालय विक्रमी वेळात उभारले आहे. आता या बांधकामाच्या किमती कमी झाले असणे शक्य आहे. मात्र यात कोणताही गैरप्रकार झाला नाही', असा खुलासा महानगर आयुक्त राजीव यांनी केला आहे. मात्र तो दावाही साटम यांनी खोडून काढला आहे. 

आता जरी बांधकामाच्या किमती कमी झाल्या असतील तरी याचा अर्थ लॉकडाऊनच्या काळात 40 टक्के दरवाढ नक्कीच झाली नव्हती. दुसरे म्हणजे सरकारी साहित्याच्या खरेदीसाठी असलेल्या सरकारी पोर्टलवर यासाठी टेंडर का मागवण्यात आली नाहीत. हे रुग्णालय विक्रमी वेळात उभारले असले तरी अजूनही त्यातील पन्नास टक्के खाटा रिक्त आहेत. मग एवढ्या घाईने हे रुग्णालय उभारण्याची गरज नव्हती. त्यावेळी थोडा जास्त वेळ घेऊन निविदा मागवून रुग्णालय उभारले असते तरी काही फरक पडला नसता. मुळात एमएमआरडीएने अत्यंत बेदरकारपणे निविदा न मागवता हे काम दिले आहे. आणीबाणी आहे म्हणून लोकांच्या पैशांचा दुरुपयोग करा किंवा कायदे पाळू नका असा नियम तर अजिबात नाही. एमएमआरडीए 24 तासात देखील निविदा मागवू शकली असती. मात्र त्यांना आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला काम द्यायचे होते, असे सांगून साटम यांनी राजीव यांचे म्हणणे खोडून काढले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख