मंत्रीपदाचा कारभार सांभाळत एकनाथ शिंदे `डिस्टिंक्शन`ने बी.ए. पास!

आॅनलाइन पद्धतीने झाली परीक्षा
मंत्रीपदाचा कारभार सांभाळत एकनाथ शिंदे `डिस्टिंक्शन`ने बी.ए. पास!
eknath shinde

ठाणे : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात ठाण्यातील ज्ञानपीठ विद्यालयाचा निकाल यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा 100 टक्के लागला आहे. राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे कला शाखेतून 77.25 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत; तर सुमन काकडे यांना 77.75 टक्के गुण मिळाले आहेत. 

वाणिज्य शाखेतून इंग्रजी माध्यमात कुमारी वैष्णवी म्हात्रे (81.83 टक्के), दर्शन नेरकर (76.58 टक्के), मराठी माध्यमात अरुण दिवेकर (71.42 टक्के) व दिनेश शाहबाजे (69.83 टक्के) हे विद्यार्थी अंतिम वर्षाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ज्ञानपीठ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ठाण्यातील केंद्र असून दर वर्षी या केंद्राचा निकाल 100 टक्के लागतो. यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आणि ऑनलाईन पद्धतीने नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आल्या, असेही प्रा. दोडके यांनी सांगितले.

मला ऐन उमेदीच्या काळात काही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते; परंतु संधी मिळताच शिक्षण पूर्ण करण्याची तळमळ होती. त्यामुळे सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेऊन शिक्षणाचा पुनश्‍च श्री गणेशा केला होता. गेली तीन वर्षे नियमित परीक्षा देऊन आता बीए पदवीधर झालो याचे समाधान आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे मात्र एम.एस. (आॅर्थो)  आहेत. 

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आमच्या विद्यालयाची निवड केली, याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे ज्ञानपीठ विद्यालयाचे प्राचार्य सतीश दोडके यांनी सांगितले. त्यांनी अंतिम वर्षासाठी मराठी आणि राजकारण (प्रत्येकी तीन पेपर) या दोन विषयांची निवड केली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.

सध्या पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथील पदवीधर विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहेत. यात अनेक नेते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. मात्र ते स्वतः पदवीधारक नसल्याचे या निवडणुकीत मतदान करू शकत नाही. नागपूरमध्ये चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे पदवी नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत. शिंदे यांच्यावर मात्र यापुढे अशी वेळ येणार नाही. ते पदवीधारक झाल्याने कोकण पदवीधर विधान परिषद मतदारसंघातून मतदानाचा हक्क बजावू शकतात. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in